esakal | भालीपाला विक्रेत्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक 
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकेश्वर तुरनर

कार्तिकेश्वर याने पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत शैक्षणिक प्रवास सुरू केला. औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरी करीत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. सतत तीन वर्ष अभ्यास केला. त्यामुळे त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

भालीपाला विक्रेत्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक 

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी(जि. हिंगोली) : दहावीच्या परीक्षामध्ये आलेले अपयश दूर सारून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर कार्तिकेश्वर तुरनर या युवकाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवित पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे. सध्या नाशिक येथील केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहे.

तालुक्यातील चारशे लोकसंख्या असलेल्या धारधांवडा या छोट्याशा गावातील गुणाजी तुरनर हे एक एकर शेतीमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. याकामी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई याही हातभार लावतात.

हेही वाचालॉकडाउनमध्ये जंगलातील पाणवठे कोरडेच...कुठे वाचा

पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न

 शेतामधील भाजीपाला आखाडा बाळापूर येथे डोक्यावरून विक्री करीत दोन मुली व दोन मुलांना त्यांनी शिक्षण दिले. यामधील सर्वात लहान असलेल्या कार्तिकेश्वर याने पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत शैक्षणिक प्रवास सुरू केला. 

कंपनीत नोकरी करीत परीक्षेची तयारी 

दहावीच्या परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतर त्याने जिद्द मनात ठेवून अभ्यास सुरू केला. आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयातून बी. कॉम पदवी पूर्ण करून त्याने औरंगाबाद गाठले. औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरी करीत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. याकरिता त्याने शहरात काही विषयांची शिकवणी लावली. 

पुस्तके वाचून काढली

स्पर्धा परीक्षेमधील सर्व बारकावे समजून घेत कार्तिकेश्वर याने चालू घडामोडी, मासिक वाचन, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र या विषयावरील विविध लेखकांची पुस्तके वाचून काढली. पोलिस उपनिरीक्षक पदाची जाहिरात निघाल्यानंतर मिळालेल्या कमी अवधीमध्ये त्याने जिद्द व परिश्रमाच्या बळावर १६ जुलै २०१७ रोजी मुख्य परीक्षा दिली.

येथे क्लिक कराहिंगोलीत तळीरामांच्या आशा भंगल्या

खडतर परिश्रमाचे चीज झाले

 पाच नोव्हेंबर २०१८ ला ग्राउंड टेस्ट घेण्यात आली. यामध्येही कार्तिकीश्वरने जिद्दीच्या बळावर यश मिळविले. आठ मार्च २०१९ रोजी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कार्तिकेश्वर महाराष्ट्रातून ४५ वा आला. मागील तीन वर्षांपासून घेतलेल्या खडतर परिश्रमाचे चीज झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

वेगळेपण सिद्ध केले

आता सात जानेवारीपासून नाशिक येथील पोलिस अधिकारी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून शिक्षण घेण्यासाठी कायम पाठिंबा दिला. स्वतःचे परिश्रम, जिद्द, कठोर मेहनतीच्या बळावर कार्तिकेश्वरने अगदी छोट्याशा गावामधून पुढे येत स्वप्न साकार करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.