esakal | Bharat Bandh Updates : लोहाऱ्यात तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा, केंद्र सरकारचा केला निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Lohara Tractor Morcha Bharat Bandh

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी (ता.आठ) पुकारलेल्या भारत बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य  ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करीत नवीन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

Bharat Bandh Updates : लोहाऱ्यात तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा, केंद्र सरकारचा केला निषेध

sakal_logo
By
नीलकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद) : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी (ता.आठ) पुकारलेल्या भारत बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य  ट्रॅक्टर मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करीत नवीन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरु केले आहे. कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील चौदा दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. तरीही यावर केंद्र सरकार सकारत्मक भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली. याला लोहारा शहरासह तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेले जेवळी, सास्तूर, माकणी, भातागळी, कानेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मंगळवारी भारत बंद असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी रात्री बंद केलेली दुकाने मंगळवारी उघडली नाहीत. त्यामुळे दिवसभर शहर कडकडीत बंद होते. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ट्रॅक्टर मोर्चास सुरवात झाली. महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.

पन्नासपेक्षा अधिक ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले होते. जय जवान, जय किसान, जाचक कृषी कायदा रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यात शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्याला कडाडून विरोध केला. त्यानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी अयनोद्दीन सवार, श्रीनिवास फुलसुंदर, विठ्ठल वचने, हरी लोखंडे, अमोल माळी, शिवमूर्ती मुळे, नवाज सय्यद, शिवकुमार स्वामी, प्रभाकर बिराजदार, बाळासाहेब पाटील, विजय ढगे, श्रीकांत भरारे, दीपक मुळे, जालिंदर कोकणे, मोहन वचने, स्वप्निल माटे, इंद्रजित लोमटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


संपादन - गणेश पिटेकर

loading image