कसाबसा सावरलेल्या पोल्ट्री व्यवसायाला ग्रहण; ‘बर्ड फ्लू’चे संकट घोंगावतय, पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क

दिलीप गंभीरे
Monday, 11 January 2021

कळंब तालुक्यात ५८ पोल्ट्री व्यवसायधारक असून ४३ पोल्ट्री व्यवसायकाची नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

कळंब (जि.उस्मानाबाद) : कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय उद्धवस्त झाला होता. तो कसाबसा सावरला असून इतर देशात कोरोनानंतर आता 'बर्ड फ्लू' हा संसर्गजन्य आजाराचे संकट घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर संकटाला तोंड देण्यासाठी पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क झाली असून तालुक्यात आजघडीला असलेल्या ४३ पोल्ट्री व्यावसायिकांशी संपर्क साधून किती पक्षी संख्या आहे. याबाबतचा आढावा घेण्यात येत आहे.

कळंब तालुक्यात ५८ पोल्ट्री व्यवसायधारक असून ४३ पोल्ट्री व्यवसायकाची नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. गावरान पक्षी आणि अंड्यांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे पोल्ट्री व्यवसायधारक आर्थिक अडचणीत सापडले होते. संकटावर मात करत व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती रुळावर येत असताना आता बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

तालुकास्तरावर पथके नेमण्यात आली असून रोजच्या रोज पक्षांना मर लागली आहे काय? किती पक्षी आहेत?खाद्य किती दिवस पुरेल? आदी संदर्भातील माहितीचा आढावा दुपार व संध्याकाळपर्यंत स्थानिक पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांमार्फत घेऊन वरिष्ठ प्रशासनाला कळविण्यात येत आहे. कोरोना महामारीचे संकट कोसळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कार्यरत पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या किती आहे.

मराठवाड्याच्या बातम्या वाचा

त्यांनी नोंदणी केली आहे का नाही? नोंदणी केली नसेल तर त्यांचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या संकटावर मात करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक सतर्क राहून स्वच्छता तसेच सॅनिटायझर करीत आहेत. कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसाय ठरतो, असे समीकरणच तयार झाले आहे. कोरोना संसर्ग कोंबड्यामुळे होत असल्याची अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी कमी दरात दिल्या. त्यामुळे प्रचंड असे आर्थिक नुकसान झाले.

रोजच्या रोज आढावा
पोल्ट्री व्यावसायिकांना रोज भेटी देऊन पक्षासंदर्भातील माहिती घेण्यात येत आहे. पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकाळ व दुपार अशी माहिती घेण्यात येऊन ही माहिती वरिष्ठ प्रशासनाला रोजच्या रोज देण्यात आहे. पक्षी संख्या किती आहे. खाद्य पुरेल का, काही अडचण आहे का याबाबतची माहिती देण्याचा सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्याचे तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Affect Poultry Business In Kalamb Osamanabad Latest News