esakal | लातूर जिल्ह्यातील बर्ड फ्लूचे केंद्रबिंदू ठरलेल्या केंद्रेवाडीत अकरा हजार कोंबड्या नष्ट, पशुसंवर्धन विभागाने उचले पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Bird_Flu

केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) परिसरातील अकरा हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. हा संसर्ग वाढू नये म्हणून पशूसंवर्धन विभागाने चोवीस तासांत ही कारवाई केली.

लातूर जिल्ह्यातील बर्ड फ्लूचे केंद्रबिंदू ठरलेल्या केंद्रेवाडीत अकरा हजार कोंबड्या नष्ट, पशुसंवर्धन विभागाने उचले पाऊल

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग सुरु झाला असून त्याचा फटका कुक्कुट पालन व्यवसायाला बसू लागला आहे. यात बर्ड फ्लूचे केंद्र बिंदू असलेल्या केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) परिसरातील अकरा हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. हा संसर्ग वाढू नये म्हणून पशूसंवर्धन विभागाने चोवीस तासांत ही कारवाई केली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केंद्रेवाडी परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कामगारांच्या आरोग्याची तपासणी सुरु केली आहे.


जिल्ह्यात केंद्रेवाडी येथे बर्ड फ्लूमुळे सुरवातीला २४० कोंबड्या मरण पावल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासन व पशूसंवर्धन विभाग कामाला लागला. यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी तातडीने केंद्रेवाडी परिसरातील एक किलोमीटर त्रिज्येत येत असलेल्या सर्व पोल्ट्री फार्मवरील पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कालपासूनच पशूसंवर्धन विभाग कामाला लागला होता. केंद्रेवाडी परिसरातील ११ हजार ६४ कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती या विभागाचे उपायुक्त नानासाहेब कदम यांनी दिली. दरम्यान या विभागाचे प्रभारी सहआयुक्त मधुसूदन रत्नपारखी यांनी केंद्रेवाडीला भेट देवून पाहणी केली. तसेच उपाययोजनांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केंद्रेवाडी परिसरात असलेल्या पोल्ट्री फार्मला भेट दिली. तेथील कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.


खुर्दवाडीत कोंबड्याचा मृत्यू
औसा तालुक्यातील खुर्दवाडीत एका ठिकाणी ८२० कोंबड्या असून त्यापैकी काल चार कोंबड्या दगावल्या होत्या. बुधवारी (ता. १३) पुन्हा १८ कोंबड्या दगावल्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वंजारवाडी येथील मृत कोंबड्याचेही नमुने प्रयोगाशाळेला पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती उपायुक्त कदम यांनी दिली.

Edited - Ganesh Pitekar