पंकजा मुंडेंसाठी 'या' महिला आमदाराची मतदारसंघ सोडण्याची तयारी

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे.

बीड : परळी मतदारसंघातून धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर कमबॅकसाठी पाथर्डी (जि. अहमदनगर) मतदारसंघाचा पर्याय आला आहे. येथून विजयी झालेल्या भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मुंडेंसमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया 

या निवडणुकीत हरले मुंडेसाहेब

मोनिका राजळे यांनी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) परळीत येऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली व हा पर्याय समोर ठेवला. दरम्यान, या प्रस्तावावर पंकजा मुंडे आणि त्यांची थिंक टॅंक विचार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र, त्या विधानपरिषदेचा पर्याय निवडणार की पुन्हा लढण्याचा हे लवकरच कळणार आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीमध्येही आहेत. मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालविकास ही महत्त्वाची खातीही आहेत. दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा परळी या होमपिचमध्ये 30 हजारांहून अधिक मतांनी चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. जिल्ह्यातही भाजपची मोठी पडझड झाली आहे.

आता राज्यात विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ 

दरम्यान, आगामी सत्तेत पुन्हा पंकजा मुंडे यांचे स्थान निश्‍चित मानले जात आहे; परंतु त्या विधिमंडळात विधान परिषदेच्या माध्यमातून जातील, असे मानले जात असतानाच आता मोनिका राजळे यांनी त्यांच्यासाठी पाथर्डीjची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी परळीत येऊन पंकजा मुंडेंची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आता पंकजा हा प्रस्ताव स्वीकारणार की विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जाणार हे लवकरच कळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader pankaja munde may contest election from pathardi nagar district