भाजप मोदी लाटेवर स्वार 

हरी तुगावकर
शनिवार, 22 एप्रिल 2017

लातूर - लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोदी लाटेवर स्वार होत व त्याला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतलेल्या कष्टाची जोड देत महापालिकेवर झेंडा फडकविला. भाजपला 70 पैकी 36 जागा मिळाल्या. तर माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी देखील या निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीला 33 जागांचे फळ मिळाले. या निवडणुकीत दलित व मुस्लिम मतदारांनी कॉंग्रेसला तारले आहे. तर भाजपला मध्यवर्गीयांनी साथ दिली. 

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच महापालिकेची निवडणूक होती. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक अस्तित्वाची केली होती. उमेदवारांची निवड, प्रचाराची यंत्रणा राबविताना त्यांनी मोठी काळजी घेतली होती. कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत रात्रंदिवस ते फिरले. त्यामुळे कॉंग्रेसला 33 जागांपर्यंत मजल मारता आली आहे. शहराच्या पूर्व भागातील दलित व मुस्लिम मतदारांनी मात्र कॉंग्रेसला तारले आहे. 33 पैकी बहुतांश उमेदवार हे याच भागातून विजयी झाले आहेत. अवघ्या तीन जागांनी पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. 

सध्याच्या महापालिकेत भाजपचा एकही नगरसेवक नाही. तरी देखील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळेसही मोदी लाट कायम होती. त्याचा फायदा श्री. निलंगेकर यांनी घेतला. "परिवर्तना'च्या नावाखाली त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत शहर पिंजून काढले होते. 66 पैकी निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी आयात केलेले उमेदवार देऊन त्यांनी ही लढाई लढली होती. रात्रीचा दिवस करीत त्यांनी कार्यकर्त्यांसाठी लढत दिली. यात ते यशस्वी झाले. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पक्षाला श्री. निलंगेकर यांनी "झिरो टू हिरो' केले आहे. 

कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा 
लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त होत आहे. मोदी लाटेत पहिल्यांदा लोकसभा कॉंग्रेसच्या हातून गेली. हे वर्ष तर निवडणुकांचे होते. यात पहिल्यांदा नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यात "सबकुछ' भाजपच राहिला. आता महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी ही धोक्‍याची घंटा समजली जात आहे. 
 
Web Title: BJP Modi effect