जयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाचे खापर भाजपवर? 

दत्ता देशमुख
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • शिवसेना कार्यकर्त्यांचाही आरोप आणि क्षीरसागरांचेही वक्तव्य 
  • मुंडे-क्षीरसागर युती टिकणार की तुटणार? 
  • क्षीरसागर म्हणाले, भाजपने सोयीने केलेली मदत लक्षात ठेवली जाईल

बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला.

विशेष म्हणजे खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनीही "भाजपने सोयीने मदत केली' असे वक्तव्य करीत याला पुष्टी दिली; मात्र घाबरू नका, ठाकरे सरकार पाठीशी असल्याचे सांगत दिलेली वचने पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भाजपने बीडमध्ये सोयीने केलेली मदत लक्षात ठेवली जाईल, असे म्हणत विरोधात काम करणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हेही वाचा - अस्तिक कुमार पांडे नवीन महापालिका आयुक्त

दरम्यान, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती असली, तरी बीडमध्ये अशक्‍य असल्याचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या चिन्हावर बदामराव पंडित गटाचे चार सदस्य असल्याने सत्तेचा दोलक तेच फिरवू शकतात. आता बदामराव पंडित खांडेंची सूचना मानणार का, असा सवाल आहे. बीड पंचायत समितीमध्येही असलेले पंचायत समिती सदस्य कोणाकडे जातात हे महत्त्वाचे आहे. जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून धीर दिला होता. आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी (ता. पाच) समर्थकांचा मेळावा घेतला. यात समर्थकांनी बीडमधून शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडले. "आपण भाजपला ताकद दिली, भाजपच्या नेत्यांची कामे केली; पण त्यांनी आपल्याला मदत करण्याऐवजी विरोधकांना मदत केली, कुंपणानेच शेत खाल्ले, निवडणुकीनंतर जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री होतील असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी आपल्याला मतदान केले नाही. जसे सत्तेत केले तसेच जयदत्त क्षीरसागरांच्या बाबतीत केले. शेवटच्या रात्री विरोधात काम केले; मात्र आता विश्वासघात करणारे सत्तेच्या बाहेर आहेत. जयदत्त क्षीरसागर संवैधानिक पदावर असोत नसोत, तेच विकास करू शकतात, त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत,' असेही कार्यकर्ते म्हणाले. 

हेही वाचा - ओळख, प्रेम आणि अत्याचार...असा झाला शेवट

जयदत्त क्षीरसागर यांनीही "बीडच्या निवडणुकीत भाजपच्या काही लोकांनी सोयीने मदत केली, हे लक्षात ठेवले जाईल,' असे म्हणत अप्रत्यक्ष इशाराच देऊन टाकला आहे. त्यामुळे आता पूर्वीपासून चालत आलेली क्षीरसागर-मुंडे युती टिकणार की तुटणार, असा प्रश्न आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, बाळासाहेब आंबुरे, नितीन धांडे, डॉ. योगेश क्षीरसागर, अरुण डाके, दिनकर कदम, विलास बडगे, दिलीप गोरे, वैजिनाथ तांदळे, परमेश्‍वर सातपुते, सुशील पिंगळे, गणेश उगले, दिलीप भोसले आदींची उपस्थिती होती. 

काळजी करू नका, सरकार पाठीशी : क्षीरसागर 
आपण जय-पराजयाच्या पायऱ्या खूप पाहिल्या आहेत. ठाकरे सरकार पाठीशी असल्याने काळजी करू नका, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत. अनेकजण सोशल मीडियातील अफवांना बळी पडले असेही ते म्हणाले. पराभवाला खचून न जाता आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो आहोत. चिंतामुक्त शेतकरी हे शिवसेनेचे धोरण असून कर्जमुक्तीबरोबरच शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, असा आपल्या सरकारचा आग्रह आहे. बीडच्या निवडणुकीत भाजपच्या काही लोकांनी सोयीने मदत केली हे लक्षात ठेवले जाईल. कुणाला एकाला दोष देण्यात अर्थ नसतो. यशाचे मालक अनेक होतात; पण पराभवासाठी कोणी येत नसतो. पुढच्या निवडणुकीसाठी आतापासूनच सज्ज व्हा, लोकांची कामे करा, असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले. 

खांडेंची सूचना बदामराव पंडित ऐकणार का? 
शिवसेनेला धोका देऊन भाजपने वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केल्याने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती करावी लागली. राज्यात महाविकास आघाडी अशी युती असली, तरी बीडमध्ये मात्र अशी युती आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे कुंडलिक खांडे म्हणाले. दरम्यान, जिल्हा परिषदेत शिवसेनेचे चार सदस्य बदामराव पंडित यांचे समर्थक आहेत. त्यांच्याच हातात सत्तेची चावी आहे. आता बदामराव पंडित त्यांची सूचना ऐकणार का, असा प्रश्न आहे; तसेच बीड पंचायत समितीचे सदस्य देखील कोणाचे ऐकतात हेही पाहावे लागणार आहे. 

क्षीरसागर-मुंडे युती टिकणार का? 
जिल्ह्याच्या राजकारणात पूर्वीपासून क्षीरसागर-मुंडे युती आहे. वेगवेगळ्या पक्षांत असतानाही अनेक निवडणुकांत त्यांची एकमेकांना पूरक भूमिका राहिलेली आहे. या निवडणुकीत युतीत असतानाही जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाला भाजप कारणीभूत असल्याचा आरोप झाला असला, तरी मागच्या वेळी क्षीरसागर राष्ट्रवादीत असतानाही त्यांच्या विजयाला भाजपने हातभार लावलेला होता. अगदी जिल्ह्यातून ते एकमेव विरोधी राष्ट्रवादीचे आमदार असतानाही विकासनिधी देताना पंकजा मुंडे यांनी कधीही हात आखडता घेतला नव्हता. त्यामुळे आता भविष्यात त्यांची युती टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याचा आरोप करून थेट डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी तोही दोघांच्या सल्लामसलतीनेच झाल्याचे बोलले जाते. आता पूर्वी विरोधी पक्षात असताना क्षीरसागर-मुंडे युती होती. आता शिवसेना-भाजप युती तुटली आहे. मग, ही युती तुटणार की टिकणार? असा सवाल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP responsible for the defeat of jaydatta Kshirsagar