
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना आता दोन महिन्यांनी सरकार येणार असल्याचे दिवसा स्वप्न पडले आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर केली.
अंबड (जि.जालना) : महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण हेच पुन्हा प्रचंड मताने निवडून येणार आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना आता दोन महिन्यांनी सरकार येणार असल्याचे दिवसा स्वप्न पडले आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर केली. शहरातील जयभवानी मंगल कार्यालयात सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मंगळवार (ता.२४) सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.सत्तार म्हणाले की, पदवीधर मतदारांनी आपले पहिले पसंतीचे मत सतीश चव्हाण यांना देवून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे. प्रास्ताविक माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केले. तर माजी राज्यमंत्री खोतकर, निसार देशमुख, भीमराव डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब घुगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागुजी मैंद, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, विनायक चोथे, भारत सांबरे, अशोक बर्डे पाटील, हनुमान धांडे, कुमार रूपवते, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मुस्ताक शेख, अकबर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व पदवीधर मतदार उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर