चोरट्यांनी पळविल्या दारुच्या बॉटल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

लॉकडाउनमुळे सर्व दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अवैध गावठी दारू विक्री केली जात आहे. पोलिस प्रशासन कारवाई करत आहे. मात्र, तरीही दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. कळमनुरीत तर आता चोरट्यांनी चक्क बियरबारवरच डल्ला मारत तब्बल २१ विदेशी दारूच्या बॉटल पळविल्या.

कळमनुरी (जि. हिंगोली): शहरातून जाणाऱ्या हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील स्वागत बियरबार दुकानाच्या दरवाजाची कडीकोंडा तोडून चोरट्यांनी विदेशी मद्याच्या दारू बाटलसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१६) मध्यरात्री घडली.

चोरट्यांनी दुकानामधील विविध कंपनीच्या एकूण तीन हजार दहा रुपयांची विदेशी दारूच्या २१ बॉटल पळवल्या. दारूची चोरी करताना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर किंमत सात हजार रुपये तोही पळून नेला. या प्रकरणी दत्तराव येलोरकर यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करीत आहेत.

हेही वाचाव्हिडिओ: आनंदाची बातमी: हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त

धानोरा, देवदरी येथे ७२ हजारांची दारू पकडली

कळमनुरी : बंद दरम्यान शहर व परिसरात गावठी दारू काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.१७) कळमनुरी पोलिसांनी धानोरा व देवदरी शिवारात दोन ठिकाणी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी संदीप पवार, सूर्यकांत भारशंकर, विकी उरेवार, श्यामराव गुहाडे यांच्या पथकाने देवदरी शिवारात दारू अड्ड्यावर छापा टाकून एक दुचाकी, मोबाईल व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तसेच शेख जमील शेख खलील व श्यामा बलखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच धानोरा शिवारात गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी दारू व काढण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अन्वर खान रहीम खान पठाण, सुधीर वाढवे, शाईन नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

येथे क्लिक करा - ...तर भारतही लवकरच कोरोनामुक्त होईल ! कोण म्हणाले वाचा

ट्रॅक्टर उलटल्याने चालक जखमी

हिंगोली : तालुक्‍यातील डिग्रस कऱ्हाळे येथे शनिवारी (ता.१८) चालत्या ट्रॅक्‍टरचे टायर फुटून हेड उलटल्याची घटना घडली. या घटनेत चालक जखमी झाला. डिग्रसपाटी येथून हिंगोलीकडे स्‍लॅब टाकण्याचे मिक्‍सर घेवून जाणारे ट्रॅक्‍टरचे टायर डिग्रस येथे अचानक फुटले. 

गावकऱ्यांनी जखमीला मदत केली

त्यामुळे ट्रॅक्टरचे हेड उलटले. यात चालक अफसर जखमी झाला. त्‍याला उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी ट्रॅक्‍टरमध्ये असलेल्या मजुरांनी उड्या मारल्याने त्‍यांना मार लागला नाही. गावकऱ्यांनी जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bottles of liquor stolen by thieves Hingoli news