नरसी येथील पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

सेनगाव शहरात वीस ते पंचवीस मीनेटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढ्यांना पूर आला. या वेळी नरसी नामदेव ते सेनगाव मार्गावर करण्यात आलेल्या वळण रस्‍त्‍यावरील पूल वाहून गेला. 

हिंगोली : सेनगाव तालुक्यात रविवारी (ता.१४) झालेल्या पावसाने आलेल्या पुरामुळे नरसी नामदेव ते सेनगाव मार्गावरील पर्यायी रस्त्याचा पूल वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हा रस्‍ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. 

हिंगोली शहरासह कळमनुरी, सेनगाव तालुक्‍यात शनिवारी सायंकाळी पाऊस झाला. तर रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. हिंगोली शहरासह अंधारवाडी, कारवाडी, खांबाळा, बळसोंड, सिरसम बुद्रूक, बोराळा, नांदूरा आदी गावांतही पाऊस झाला. 

हेही वाचाहिंगोलीत ३५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत -

पुलावर मोठे भगदाड पडले

तसेच सेनगाव शहरात वीस ते पंचवीस मीनेटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढ्यांना पूर आला. या वेळी नरसी नामदेव ते सेनगाव मार्गावर करण्यात आलेल्या वळण रस्‍त्‍यावरील पूल वाहून गेला. पुलावर मोठे भगदाड पडले. त्यामुळे यामार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे. 

पुराच्या पाण्याने शेतजमिनी खरडल्या

कळमनुरी : तालुक्‍यातील हातमाली येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे वळण रस्त्यामध्ये सिमेंटच्या नळ्या टाकण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता.१३) ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पेरणीसाठी तयार केलेली शेतजमीन खरडून गेल्याचा प्रकार घडला. दरम्यान, हा वळण रस्ता चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

पुलाचे बांधकामही प्रगतिपथावर

उमरा फाटा ते वसमत या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आली आहे. या मार्गावर असलेल्या ओढ्या व नाल्यावरील पुलाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी वळण रस्ते काढून मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे. हातमाली जवळील ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे.

पेरणीसाठी तयार शेती खरडून गेली

 शनिवारी झालेल्या जोरदार पावसानंतर ओढ्याला पूर आला. मात्र, पुराचे पाणी पुल बांधकामाच्या सेंट्रींगला गाळ अडकून ओढ्याचे पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये घुसले आहे. यात खरीप पेरणीसाठी तयार केलेली शेती खरडून गेली आहे. यामध्ये संजय शेषराव भोयर, राजू भोयर, शिवराम भोयर, या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

येथे क्लिक कराइसापूर धरणात ३३ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध -

महसूलच्या कर्मचाऱ्यांनी केला पंचनामा 

याची माहिती भागवत भोयर, बद्री विशाल भोयर, फकीरा भोयर, सुभाष भोयर व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना दिली. रविवार (ता.१४) मंडळ अधिकारी आनंदराव सुळे, तलाठी श्री. वाठोरे त्यांनी पंचनामा केला आहे.

पुलाचे पाणी शेतात गेल्याने नुकसान

आंबाचोंढी : वसमत तालुक्‍यातील कोर्टा पाटीजवळ नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाने पाणी पुलाला तुंबल्याने परिसरातील पेरणी केलेल्या पिकात साचले आहे. पावसाने ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी संदीप भोकरे, शिवाजी भोकरे, साईबाबा काजळे, बाबूराव साबळे, शेख राजू यांच्या शेतात गेले आहे. नुकतीच या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्‍यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बाबत येथे स्‍थळ पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ॲड. ऋषीकेश देशमुख सेलुकर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bridge At Narsi Was Swept Away And The villages Were Cut Off Hingoli News