जिंतूर तालुक्यात भोगाव (देवी) येथे घरफोडी ; नऊ लाखांचा ऐवज लंपास 

राजाभाऊ नगरकर 
Sunday, 18 October 2020

जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ही दुसरी दरोडा, घरफोडीची घटना आहे. 

जिंतूर ः तालुक्यातील भोगाव (देवी) येथे शनिवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह नऊ लाख तीन हजारांचा ऐवज लंपास केला. या वेळी घरातील सर्व सदस्य समोरच्या खोलीत गाढ झोपेत असताना चोरीचा प्रकार घडला, तो दुसरे दिवशी (ता.१८) भल्या पहाटे कुटुंबियांना जाग आल्यानंतर उघडकीस आला. दरम्यान, पाथरीजवळील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी लाठ्या काठ्याचा वापर करत एका घरावर दरोडा टाकून एक लाखाच्या सोन्याच्या दागिन्याची लूट केल्याची घटना शनिवारी (ता.१७) पहाटे चार वाजता घडली. दोन दिवसांत जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. 

भोगाव येथील विनोद वामनराव मोरे यांचे चार खोल्यांचे घर असून घरातील सर्व सदस्य समोरच्या एका खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला व तीन खोल्यामधील वेगवेगळे कपाट तोडून त्यातील पंधरा तोळ्याचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत नऊ लाख व रोख तीन हजार मिळून एकूण नऊ लाख तीन हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. 

हेही वाचा - गुड न्यूज ः परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु येतोय आटोक्यात

श्वान जवळपासच घुटमळले
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक स्वामी, बालाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी परभणी येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असता श्वानाने घटनास्थळापासून मुख्य रस्त्यावरील एका शेतापर्यंत चोरट्यांचा माग काढला त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले. याप्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली 

बांदरवाडा शिवारात धाडसी दरोडा 
पाथरी ः  शहराजवळील बांदरवाडा शिवारात दरोडेखोरांनी लाठ्या काठ्याचा वापर करत एका घरावर दरोडा टाकला. यात दरोडेखोरांनी एक लाख किमतीच्या सोन्याच्या दागिन्याची लूट केली. ही घटना शनिवारी (ता.१७) पहाटे चार वाजता घडली. सकाळी परभणीहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांनंतर पुन्हा दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांदरवाडा येथील भागवत चतुर्भुज वाघमारे यांचे गावानजीक असलेल्या शेतातील आखाड्यावर पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी भागवत वाघमारे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी खोलीची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर दरोडेखोर फरार होत असताना व्हरांड्यात असलेल्या पार्वतीबाई यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची पोत ओरबाडून घेत दरोडेखोरांनी पोबारा केला. त्यानंतर भागवत यांनी वरच्या खोलीत झोपलेल्या भावास उठविण्यास गेले असता त्यांना त्यांच्या खोलीचे दार बाहेरून दोरीने बांधून टाकल्याचे निदर्शनास आले. यावरून चोरटे पूर्ण तयारीने आले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी टिप्पलवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, भागवत वाघमारे यांनी पाथरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary at Bhogaon (Devi) in Jintur taluka; Lampas looted Rs 9 lakh, Parbhani News