esakal | गॅस स्फोटात चार दुचाकीसह आखाडा जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

 दाताडा खुर्द शिवारातील आखाड्यावर अचानक गॅस पेटविलेल्या आगीमुळे आखाड्याच्या कुडानाने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच घरातील सर्व सदस्यांनी आखाड्याच्या बाहेर धाव घेतली. या वेळी पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. 

गॅस स्फोटात चार दुचाकीसह आखाडा जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील दाताडा खुर्द शिवारात गॅस टाकीचा स्फोट होऊन चार दुचाकीसह आखाडा जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (ता.१६) सायंकाळी घडली. या वेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत आगीत सर्वच खाक झाले होते.

सध्या कोरोनाचे संकट निर्माण झाले असून प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहेत. लॉकडाउनमुळे बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. तसेच नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकजण शेतात थांबत आहेत.

हेही वाचाकोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना

चहा करण्यासाठी गॅस पेटविला

 सेनगाव तालुक्यातील दाताडा खुर्द येथील गणेश काळे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शेतातील आखाड्यावर राहत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास संगीता काळे यांनी चहा करण्यासाठी गॅस पेटविला.

आखाड्याच्या कुडानाने पेट घेतला

 या वेळी अचानक गॅसच्या आगीने आखाड्याच्या कुडानाने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच घरातील सर्व सदस्यांनी आखाड्याच्या बाहेर धाव घेतली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी या वेळी घरामध्ये गणेश काळे, अमोल काळे, ज्ञानेश्वर काळे, संदीप काळे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले.

संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळाली

 मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे घरातील गॅस सिलेंडरचा काही वेळातच स्फोट झाला. या स्फोटात तीन बजाज डिस्कवर; तर एक हिरो स्प्लेंडर अशा चार दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम वीस हजार रुपये आगीच्या भक्षस्थांनी सापडले.

हरणाच्या पिल्लाचा विहिरीत पडून मृत्‍यू

आखाडा बाळापूर : कांडली (ता. कळमनुरी) शिवारामध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणाच्या पिल्लाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१६) घडली असून शेतकऱ्यांनी मृत हरणाला बाहेर काढले आहे.

हरणाचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले

कांडली शिवारात बाबूराव निर्मले यांच्या शेतामध्ये विहीर असून विहिरीला मुबलक पाणी आहे. शनिवारी सकाळी श्री. निर्मले हे शेतात विहिरीवर पाइपलाइन टाकण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत हरणाचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले. 

येथे क्लिक कराहिंगोलीत ८१ योद्ध्यांनी कोरोनाला हरविले

पाण्याच्या शोधात आले होते पिल्लू

त्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री. काळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
 त्यानंतर मृत हरणाचे पिल्लू विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दोन दिवसापूर्वी हरीण पाण्याच्या शोधात आले असता विहिरीत पडले असावे, असा अंदाज काढण्यात आला.

वन्यप्राण्यांची भटकंती

सध्या नदी, नाले आटले आहेत. तसेच तलावातील पाणीसाठाही कमी झाला आहे. माळरानावर पाण्याची सुविधा नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अनेक वेळा मानवी वस्तीकडे वन्यप्राणी धाव घेत आहेत. यातून वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.