
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जासह अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यावर मात करून दाखल केलेल्या अर्जावर आक्षेप येताच उमेदवारांना घाम फुटला.
लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो टिकून राहावा, यासाठी उमेदवारांना गुरुवारी मोठे प्रयत्न करावे लागले. छाननीतच बाद करण्यासाठी विरोधकांनी आक्षेपांच्या माध्यमातून टाकलेले डावपेच पाहून इच्छुकांना चांगला घाम फुटला. पहिल्याच प्रक्रियेत विरोधी व प्रबळ उमेदवाराला निवडणूक रिंगणाच्या बाहेर काढण्यासाठी अपात्रतेच्या विविध कारणांचा शोध घेऊन विरोधकाचा अर्ज बाद करण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. यातूनच तहसील कार्यालयाच्या आवारात दिवसभर वकिलांना घेऊन जोरकस प्रयत्न आणि तीव्र हालचालींचे चित्र दिसून आले.
मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जासह अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यावर मात करून दाखल केलेल्या अर्जावर आक्षेप येताच उमेदवारांना घाम फुटला. दोनपेक्षा अधिक अपत्य असणे, ग्रामपंचायत कराची थकबाकी असणे, निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवलेले असणे, उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र तसेच प्रमाणपत्र पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोचपावती नसणे, २१ पेक्षा कमी वय असणे, मतदार यादीत नाव नसणे, दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीत नाव असणे आदींसह अनेक आक्षेप उमेदवारी अर्जावर घेण्यात आले. या आक्षेपासाठी अनेकांनी बुधवारपासूनच (ता. ३०) तयारी केली होती. यात महिला उमेदवारांच्या माहेरच्या नावाने असलेल्या जात प्रमाणपत्रांवरही आक्षेप घेण्यात आले. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत आक्षेपावरील सुनावणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुरू होत्या. विधिज्ञांकडून दावे व प्रतिदावे सुरू होते. यामुळे वैध व अवैध अर्जाची आकडेवारी बाहेर आली नव्हती. तरीही थोड्या ग्रामपंचायती व जागा बिनविरोध निवडून येण्याचा बोलबोला ऐकायला मिळाला.
हे ही वाचा : सुरक्षित लातूरसाठी हवेत २४५ कॅमेरे, महापालिकेचा तीन कोटींचा प्रस्ताव ‘डीपीसी’च्या लालफितीत
सुमारे दहा हजार अर्ज
जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या तीन हजार ५४८ जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुमारे दहा हजार ८२ अर्ज दाखल झाले. यात बुधवारी एका दिवशी सहा हजार ४१९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. दाखल अर्जात खुला प्रवर्गातील ७३४ तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांच्या एक हजार ५३ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले होते. अर्जाच्या संख्येमुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा : नववर्षात व्हावी कोरोनामुक्तीची पहाट; सुदृढ आरोग्य, सक्षम आर्थिक स्थितीची अपेक्षा
छाननीतच बाद करण्याचे प्रयत्न
अपात्र सदस्यांमुळे गोंधळ
२०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च न दिलेल्या ३६ हून अधिक उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. अशांचे अर्ज बाद होणार होते. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याप्रकरणी अपात्र ठरलेल्या सदस्यांच्या अर्जांवरील आक्षेपामुळे गोंधळ उडाला. उदगीर व जळकोट तालुक्यांतील अशा सदस्यांच्या अपात्रतेचा एकत्रित आदेश काढण्यात आला होता. उर्वरित तालुक्यांतील अशा सदस्यांवर आक्षेप आल्यानंतर आदेश काढण्यात आले होते. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दिलेल्या सदस्यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले होते. मात्र, त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आल्याचा समज करून आक्षेप घेण्यात आले, यावरून गोंधळ उडाला होता.
नव्या वर्षात माघारीचे प्रयत्न
निवडणुकीत अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना चार जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. यामुळे नवीन वर्षात अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. विरोधकांना अर्ज मागे घेण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची तयारी सुरू झाली होती. यात आक्षेप घेऊनही अर्ज बाद न झालेल्या प्रकरणात न्यायालयात अपिल दाखल करण्याचे नियोजन सुरू झाले होते. छाननीच्या निमित्ताने निवडणुकीतील तीव्र स्पर्धा व चुरशीची चुणूक सर्वांना पाहायला मिळाली.