सुरक्षित लातूरसाठी हवेत २४५ कॅमेरे, महापालिकेचा तीन कोटींचा प्रस्ताव ‘डीपीसी’च्या लालफितीत

हरी तुगावकर
Friday, 1 January 2021

लातूर शहरातील वाहतूक नियंत्रण तसेच गुन्ह्याचा शोध व प्रतिबंध यासाठी शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे.

लातूर : शहरातील वाहतूक नियंत्रण तसेच गुन्ह्याचा शोध व प्रतिबंध यासाठी शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. यातून महापालिकेने सुमारे तीन कोटींचा प्रस्ताव तयार करून जिल्हा विकास समितीकडे (डीपीसी) पाठवला आहे. यात शहरात अत्याधुनिक स्वरूपाचे २४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा हा प्रस्ताव आहे. सध्या हा प्रस्ताव डीपीसीच्या लालफितीत अडकला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी याला मंजुरी दिली तर शहर २४५ कॅमेऱ्याच्या नजरेत येणार आहे. शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लोकसंख्याही वाढू लागली आहे. यातून गुन्हेगारीही वाढत आहे. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर तो शहरातून पळून जात असेल तर तो या कॅमेऱ्याच्या नजरेत येवू शकतो. तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे.

 

 

त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी देखील हे कॅमेरे महत्त्वाचे ठरत आहेत. शहरातील विविध ५५ चौकात २४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तीन कोटी १४ लाख ३३ हजार रुपयांचा हा प्रस्ताव आहे. या कॅमेऱ्यात एएनपीआर १५, बुलेट १९०, पीटीझेड ३०, पीए-१० कॅमेऱ्याचा समावेश आहे. हे कॅमेरे अत्याधुनिक तर आहेतच. पण, त्यासोबत बसवली जाणारी यंत्रणाही अत्याधुनिक असणार आहे. सोबतच आयपी बेस पीए यंत्रणा ही असणार आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करणे सोपे जाणार आहे. ही सर्व यंत्रणा ओएफसी केबलने जोडली जाणार आहे. कॅमेरे बसवणाऱ्या कंत्राटदारावर पाच वर्षांची जबाबदारी टाकली जाणार आहे. यात पाच वर्षांची वॉरंटी, सर्व्हिस, टेक्निकल मनुष्य बळ पुरवणे, दुरुस्तीची कामे करण्याचा समावेश असणार आहे. महापालिकेने हा प्रस्ताव डीपीसीला पाठवला आहे. पण, सध्या तो लालफितीत अडकला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर शहर अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या नजरेखाली येणार आहे.

कंत्राटदाराचे पैसे खाते महापालिका
शहरात २०१७ मध्ये ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यावेळी महापालिकेने कंत्राटदाराकडून पाच लाख रुपये सुरक्षा ठेव घेतली होती. त्यानंतर या कंत्राटदाराने आतापर्यंत या कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली आहे. हे सर्व बील पंधरा लाखांच्या घरात गेले आहे. सुरक्षा ठेवदेखील महापालिका देत नाही. इतकी वाईट अवस्था आहे. सध्या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणची १४ कॅमेरे बंद आहेत. कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम करणे बंद केले आहे. याकडेही आता संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

 

शहरातील गुन्ह्यांपैकी पंधरा ते वीस टक्के गुन्हे हे दुचाकी चोरीचे आहेत. शहरात वाहतुकीची कोंडीही सातत्याने होते. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे आहेत. शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व ठिकाणावर हे कॅमेरे असणार आहेत. चोरीचे वाहन शहराच्या बाहेर जात असेल तर त्याची तातडीने माहिती नियंत्रण कक्षास मिळू शकणार आहे. इतके अत्याधुनिक कॅमेरे हे असणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे शहराची गरज आहे.
- सचिन सांगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More Cameras Needed For Latur Security