
२०२० हे वर्ष कोरोनामुळे सर्वांना कष्टदायक राहिले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
जालना : २०२० हे वर्ष कोरोनामुळे सर्वांना कष्टदायक राहिले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे आता नवीन वर्षात तरी कोरोनामुक्तीची नवीन पहाट व्हावी, ही अपेक्षा आहे. कोरोनाच्या विळख्यामुळे २०२० चे अर्ध वर्ष हे लॉकडाउन आणि निर्बंधामध्ये गेले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. तर अनेकांना लॉकडाउनमध्ये पायपीट करून गावाचा रस्ता धरण्याची वेळ आली. नवीन वर्ष कोरोनामुक्त असावे, हीच अपेक्षा प्रत्येक जण व्यक्त करीत आहे.
अर्थचक्रावर परिणाम
जालना शहराची औद्योगिक नगरीसह व्यापारी पेठ म्हणून सर्वत्र ख्याती आहे. मात्र, वर्ष २०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आली होती. त्यामुळे कधी नव्हे तो सर्व स्टील उद्योगही बंद ठेवावा लागला. तसेच इतर सर्व व्यवसाय ही बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यामुळे अर्थचक्र थांबले होते. स्टील उद्योगाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. तर अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले. नवीन वर्षात उद्योगासह व्यवसायांमध्ये तेजीची आशा आहे.
नववर्षांत ही निर्बंध कायम
जिल्ह्यात लॉकडाउन टप्पानिहाय उघडण्याबाबतच्या केलेल्या उपाययोजना बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वे ता. ३१ जानेवारीपर्यंत अमलात राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुले नववर्षाच्या प्रारंभीही निर्बंध कायम असतील.
तिघांचा मृत्यू; २१ बाधित
जिल्ह्यात गुरूवारी (ता.३१) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३४९ जणांचा कोरोनामुळे बळी गेले आहेत. शिवाय २१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ४१जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत १३ हजार १६७ कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांपैकी १२ हजार ५३७ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात २८१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
Edited - Ganesh Pitekar