
सोनेसांगवीचे शाखा डाकपाल दत्तात्रय काळे याच्याविरोधात अपहार व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सीमाली कोळी या करत आहेत.
केज (बीड) : तालुक्यातील सोनेसांघवी येथील टपाल खात्याच्या शाखा डाकपालाने मासिक ठेव (आरडी) योजनेत ५८ खातेदारांनी भरणा केलेली ६५ हजार १५० रुपयांची रक्कम शासनाकडे जमा न करता या रक्कमेेेचा परस्पर वापर केला आहे. त्यामुळे रक्कमेचा अपहार करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून शाखा डाकपाल दत्तात्रय कविदास काळे याच्याविरोधात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुरूवार (ता.०३) रोजी ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : बेरोजगारांसाठी नोकरीची संधी : बीडमध्ये रोजगार मेळावा
तालुक्यातील सोनेसांगवी येथील पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल या पदावर गावातील दत्तात्रय काळे हे कार्यरत होते. मासिक ठेव योजनेत गावातील ५८ खातेदारांनी शाखा डाकपाल काळे यांच्याकडे ऑक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत रक्कमेचा भरणा केला होता. त्यांनी या खातेदारांना स्विकारलेल्या रक्कमेची त्यांच्या पासबुकमध्ये सविस्तर नोंद ही करून दिली आहे.
ही मासिक ठेव योजनेत खातेदारांनी भरणा केलेली रक्कम नियमितपणे शासनाकडे जमा करणे आवश्यक असते. परंतु डाकपालांनी मासिक ठेव योजनेची ५८ खातेदारांनी भरलेली ६५ हजार १५० रुपयांची रक्कम शासनाकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून शासकीय रक्कमेचा अपहार केला आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा : मुलाने गळफास घेतल्यानंतर वडिलानेही संपविले आयुष्य! वैजापूरातील घटना
त्यामुळे याप्रकरणी अंबाजोगाईचे उपविभागीय डाक निरीक्षक सचिन मल्लिकार्जुन स्वामी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सोनेसांगवीचे शाखा डाकपाल दत्तात्रय काळे याच्याविरोधात अपहार व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सीमाली कोळी या करत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले