केंद्राने या योजनेसाठी घेतला आखडता हात

FILE PHOTO
FILE PHOTO

नांदेड : केंद्र सरकारने २०१५ पासून शहरी व ग्रामीण भागासाठी पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली. महापालिका आणि ग्रामीण स्तरावर लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येत आहे. शहरातील काही बांधकाम व्यवसायिकांनीदेखील योजनेत बसणारी घरे बांधून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार म्हणून वर्षभरापूर्वी घरांची विक्री केली आहे.

यासाठी आवश्यक ती कागदपत्र संबंधित बँकेत सादर केली. परंतु, मागील अनेक महिन्यांपासून लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळाला नसून आजही त्यांची प्रतीक्षा कायम आहे. केंद्र शासनाने जून २०१५ मध्ये नऊ राज्यात तीन टप्प्यांत पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. शहरी भागातील लाभार्थींना दोन लाख ६७ हजार, तर ग्रामीण भागातील लाभार्थींना दीड लाखापर्यंत लाभ दिला जातो. ही योजना २०१५ ते २०१७, २०१७ ते २०१९ आणि २०१९ ते २०२२ अशी तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवाल
नांदेड महापालिका क्षेत्रातील सर्वांसाठी घरे २०२२ अंतर्गत एकूण व्यक्तिगत बांधकाम घटक (बीएलसी) प्रकल्प १२ अहवालांतर्गत २०१९ मध्ये उद्दिष्टपूर्तीपेक्षा दुप्पट, म्हणजेच सात हजार ३३१ घरकुलांना मंजूर करून शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. यातील केवळ साडेआठशे घरांचे काम पूर्णत्वास आले आहे, तर दोन हजार ४२१ घरांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यातील साडेतीन हजार लाभार्थींना बांधकाम परवानगी देण्यात आल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिले आहे. यातील लाभार्थींना ४० हजार रुपये याप्रमाणे दोन हजार ९४३ लाख इतकी रक्कम पहिला हप्ता म्हणून वाटप करण्यात आली. त्यामुळे लाभार्थींना दुसरा हप्ता वाटप करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

बांधकाम व्यवसायिकांनी  सर्वांना परवडतील अशी घरे 

ग्रामीण भागातील लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २९ हजार २८ इतके उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील २७ हजार लाभार्थींना आॅनलाइन मंजुरी मिळाली आहे. मात्र, असे असले तरी १४ हजार २६२ घरांचे काम पूर्णत्वास गेले असून अजून १४ हजार ७६६ घरांचे काम अपूर्ण आहे. त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. महापालिका हद्दीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या ११ हजार ४४२ लाभार्थींचे स्थलांतर, मोबाईल बंदमुळे कामे रखडली आहेत. शिवाय १३ हजार ७३० लाभार्थींची कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळाला नाही. महापालिकेच्या हद्दीतील बांधकाम व्यवसायिकांनी पंतप्रधान आवास योजनेत बसतील अशा पद्धतीची २५ स्वेअर मीटर (२७० स्वेअर फूट) जागेत सर्वांना परवडतील, अशी घरे बांधून त्या घरांची विक्री सुरू केली आहे.

पाच बांधकाम व्यवसायिकांचा घरे बांधून देण्याचा प्रस्ताव
२०१९ पूर्वी ज्या लाभार्थींनी बांधकाम व्यवसायिकांकडून घरांची खरेदी केली त्या लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्याकडे बघून इतर लाभार्थींनीदेखील बांधकाम व्यवसायिकांकडून घर खरेदी करण्यास पसंती दिली. परंतु, मागील वर्षभरापासून एकाही लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. सध्या महापालिकेकडे पाच बांधकाम व्यवसायिकांनी मिळून दोन हजार सहाशेपेक्षा अधिक पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधून देण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.


ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या नियमात बसणारी घरे बांधल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून या योजनेत घरे खरेदी केलेल्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेकजण नाराज होत आहेत.
- अभिजित रेणापूरकर, बांंधकाम व्यवसायिक, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com