केंद्रीय पथक उस्मानाबाद दौऱ्यावर, अडीच महिन्यानंतर करणार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

उस्मानाबाद : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. अतिवृष्टी होऊन अडीच महिने झाल्यानंतर आता हे पथक काय पाहणार? नेमके या पथकाला काय दाखवायचे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे; तर ‘वरातीमागून घोडे’ अशी स्थिती शासनाची असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून येत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने शेती जमिनीचे तसेच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

 

 

त्यानंतर राज्य शासनाकडून काही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः या संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक जेव्हा परिस्थिती अचानक बिघडते, तेव्हा कोणीच मदत करीत नाही. आता हळूहळू सावरण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर पथक येऊन परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने शेतकऱ्यांत संतापाची भावना व्यक्त होत आहे.

अशी आहे स्थिती
अतिवृष्टीचा फटका प्रामुख्याने उस्मानाबाद, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला होता. या भागातील अनेक ठिकाणची शेतजमीन वाहून गेली. पिकेही पुराच्या पाहण्यामध्ये वाहून गेली होती. तेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट होती. उशिरा का होईना, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळाली. मात्र, आता अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथक नेमके काय पाहणार? हा मोठा संशोधनाचा विषय असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.

 

 

वास्तविक अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळूहळू शेतीत मशागत केली. ज्या ठिकाणची माती वाहून गेली. अशा ठिकाणी जमीन सपाटीकरण करून घेतले. जर दोन-अडीच महिने शेतजमीन पडून ठेवली तर रब्बीचे पीकही पदरात पडणार नाही. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. याची माहिती असल्याने शेतकऱ्यांनी जमीन दुरुस्त करून पेरणी केली आहे. त्यामुळे आता हे पथक काय पाहणार अन् या पथकाला काय दाखवायचे? याचे कोडे प्रशासनालाही पडले आहे.

या ठिकाणी जाणार पथक
केशेगाव, पाटोदा (ता. उस्मानाबाद), सास्तुर, राजेगाव (ता. लोहारा), आपसिंगा, काक्रंबा, कात्री (ता. तुळजापूर) अशा सात ठिकाणी हे पथक जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Team Today Visit Heavy Rain Hit Parts In Osmanabad District