अस्सं लावलं लेकीचं लग्न, की मसणवट्यात उठल्या पंगती

file photo
file photo

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर शहरातील जैन स्मशानभूमीमधील चौकीदार विठ्ठलराव जाधव यांच्या मुलीचा विवाह सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये गुरुवारी (ता. २७) सनई चौघड्यांच्या निनादात थाटामाटाने विवाह सोहळा पार पडला. हा विवाह कुतूहलाचा विषय बनल्याने शहरात याबद्दल चर्चा होत आहे.

प्रसंगी एखाद्याला स्मशानभूमीमध्ये अथवा स्मशानभूमीजळून जरी एकटे जाण्याची वेळ आल्यास जीव मुठीत धरून थरथरत्या पावलाने देवाचे नामस्मरण करत वाट चालतात. परंतु, रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत, तेही सरणावर चिता जळत असताना मसणजोगी कुटुंबीयांसह वास्तव्यास राहतात.

त्याप्रमाणेच जैन समाजाच्या स्मशानभूमीमध्ये गेली दहा वर्षांपासून चौकीदार म्हणून काम पाहणारे विठ्ठलराव जाधव यांची कन्या सुमित्रा जाधव यांचा विवाह कोल्हार (ता. शिर्डी, जि. अहमदनगर) येथील गोविंद गणेशराव गायकवाड यांच्याशी जुळला. 

भीती घालविण्यासाठी घेतला निर्णय

सामान्य नागरिकांच्या मनात स्मशानभूमीविषयी असलेली भीती घालविण्यासाठी विठ्ठलराव जाधव यांनी हा विवाह स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेतला. परंतु, जैन समाजाची स्मशानभूमी लहान असल्याने त्यांनी पालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयाला वरपिता गणेशराव गायकवाड यांनीही सहमती दिली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी गणेशराव गायकवाड हे आपल्या मुलाची वरात घेऊन वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

त्यानंतर नवरदेव मारोतीचे दर्शन घेऊन आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सनई विवाह संपन्न झाला. या वेळी जाधव यांनी लग्नपत्रिका छापून अनेक मान्यवरांना विवाहाचे निमंत्रण दिले होते.

परंतु, अनेकजण स्मशानभूमीच्या भीतीपोटी लग्नास आले नसले तरीही गजानन देवकर, गौतम मस्के, बालाजी शिनगारे, किशन सुतार, सदाशिव जाधव, महिला पोलिस कर्मचारी संगीता वाघमारे, माजी नगरसेविका अनुजा तळणीकर, कविता घनसावध, आशा खिल्लारे, राजश्री देबाजे, सुमित्रा मुकाडे, शेवंता प्रधान, रामभाऊ जाधव, परमेश्वर पवार आदींसह अनेक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नकार्य सोमेश्वर संतोष स्वामी यांनी पार पाडले. 

दहनवाहिनीसमोरील पटांगणात रंगल्या जेवणावळी

विवाहानंतर वऱ्हाडी मंडळींनी अंत्यसंस्कार करण्यासाठीच्या ओट्यासमोरील हिरवळीवर जेवणाच्या पंगती आटोपल्या. त्यामुळे जे आजही अंधश्रद्धेतून बाहेर पडले नाहीत त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा देणारी बाब समजली जात आहे. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यात कुणीच मद्यप्राशन केले नव्हते. मसनजोगी समाजात लग्नात दारू पिऊन येणाऱ्यास जातपंचायत मोठ्या रकमेचा दंड ठोठावते. ही बाब अनुकरणीय असल्याचे म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com