युपीएससी प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठीही सीईटी, राज्यातील सहा केंद्रांमध्ये एकच फॉर्म्युला

विकास गाढवे
Sunday, 29 November 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे.

लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. एमएचटी - सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून राज्यातील सहा केंद्रांतील प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी आता एकच फार्म्युला असणार आहे. सामायिक परीक्षेत पूर्व परीक्षा, लेखी परीक्षा व मुलाखतीचा समावेश असला तरी त्या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हव्या त्या केंद्रात प्रवेश घेता येणार आहे.

युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, यासाठी राज्य सरकारने सुरवातीला मुंबईत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. संस्थेमुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले. यामुळे सरकारने मुंबईतील संस्थेच्या धर्तीवर सुरवातीला नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद येथे व त्यानंतर अमरावती व नाशिक येथे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली. संस्था व केंद्रांच्या वतीने दरवर्षी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा व त्यानंतर मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड केली जाते. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रांच्या वतीने परीक्षा घेण्यात येते. यात सर्व केंद्रांचे प्रवेश व प्रशिक्षण एकाच कालावधीत होत नव्हते.

अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या व सोयीच्या केंद्रात प्रवेश मिळत नव्हता. सर्व केंद्रांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागत होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सर्वच प्रशिक्षण केंद्रांसाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव पुणे येथील उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सरकारला जुन २०१९ मध्ये पाठवला होता. त्यावर सर्व केंद्रांच्या २६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सरकारने शुक्रवारी (ता. २७) सर्व सहा प्रशिक्षण केंद्रांसह यापुढील काळात जिल्हास्तरावर स्थापन होणाऱ्या सर्व केंद्रांसाठी ऑनलाईन एकच लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात घेण्याचा निर्णय जाहिर घेतला. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचा समावेश असणार आहे. लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांनुसार व केंद्राच्या विकल्पानुसार विद्यार्त्यांची निवड करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मुलाखतीसाठी आता पॅनेल
प्रवेश प्रक्रियेतील मुलाखतीसाठी स्वतंत्र पॅनेल तयार करण्याचे आदेश सरकारने यानिमित्ताने दिले आहे. विविध पदांच्या मुलाखतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील आधारित हे पॅनेल करण्याची सुचना सरकारने केली आहे. यासोबत प्रवेश परीक्षा शुल्कातही वाढ केली आहे. प्रवेश परीक्षेसाठी पूर्वी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून तीनशे तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून दीडशे रूपये शुल्क घेण्यात येत होते. यातून परीक्षेचा खर्च भागवणे शक्य नसल्याने त्यात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता खुल्या प्रवर्गासाठी पाचशे तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अडीचशे शुल्क असणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET For UPSC Training Centers