
डब्लूएचओच्या मुख्य वैज्ञानिक स्वामिनाथन यांची माहिती; तीर्थ व्याख्यानमालेत संवाद
लातूर : कोरोनावर जगात सध्या दोन ते तीन लसीची ट्रायल सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये एक ते दोन लसीला काही देशात इमर्जन्सी युजर लायसन्स मिळेल. सर्व लसीचे प्रिकॉलिफिकेशन करून आणि डेटा पाहून समाधान मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीचे गावी संस्थेच्या माध्यमातूनच जगभर वितरण केले जाईल. श्रीमंत व गरीब देश असा भेद होता जगभर एकाच वेळी ही लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत. मार्च व एप्रिलपासून लसीचे वितरण सुरू होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
दरम्यान, थोडीही ढिलाई कराल तर कोरोनाला प्रसाराची संधी मिळणार आहे. संधी देऊ तोपर्यंत तो वाढणारच आहे. हेच दुसऱ्या लाटेचे कारण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवारी (ता. २८) आयोजित ‘संवाद जागतिक आरोग्य तज्ज्ञांशी’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. द व्हॅक्सिन अलायन्सच्या आरोग्यतज्ज्ञ डॉ. रंजना हळबे कुमार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व व्याख्यानमालेचे सचिव अतुल देऊळगावकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या, ‘‘कोरोना विषाणू हा नैसर्गिक आहे. तो मानवनिर्मित किंवा प्रयोगशाळेतून तयार झालेला नाही. मानवजात स्वतःला सर्वोच्च समजते. या समजानेच विषाणूंचा आघात वाढत आहे. वृक्षतोडीमुळे अनेक वन्य व जंगलीप्राणी मानवांच्या सहवासात येत आहेत. प्राण्यांवर काहीच परिणामकारक न ठरणारे त्यांच्यातील विषाणू मानवांना अपायकारक ठरत आहेत. कोरोना त्याचाच भाग आहे. हवा खेळती नसलेल्या ठिकाणी कोरोना विषाणू अधिक काळ टिकतो. यामुळे गर्दी टाळणे हाच चांगला उपाय आहे. संपर्कात न येता संसर्ग होण्याची बाब दुर्मिळात दुर्मिळ आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ज्ञानात भर पडेल तसे उपचार पद्धतीत बदल होत गेला. सुरवातीला इतर विषाणूसाठी वापरलेले औषध वापरले गेले. भारतात औषधांचा मारा जास्त केला जातो. एवढ्या औषधांची आवश्यकता नाही. अँटिबायोटिक्स कोरोनावर परिणामकारक ठरू शकत नाही. लॉकडाउन हा कोरोनाला रोखण्याचा परिपूर्ण उपाय नाही. सुरवातीला हा पर्याय वापरल्याने आरोग्य यंत्रणेला तयारी करण्यासाठी वेळ मिळाला.’’
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तरुणाईमुळे भारतात कमी मृत्यू
भारत व आफ्रिकेत तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातील प्रतिकारशक्तीमुळे दोन्ही देशात मृत्यूचे प्रमाण कमी झाले. कोरोनाच्या संबंधाने अचूक आकडेवारी नाही. देशात मृत्यूच्या कारणांचे सहसा संशोधन केले जात नाही. घरी मृत्यू झालेल्यांची संख्या मोजली जात नाही. लसीमुळेच हार्ड इम्युनिटी तयार होईल. ७० टक्के लोकांमध्ये लसीमुळे इम्युनिटी तयार झाल्यानंतर महामारीचा अंत सुरू होईल.
जागतिक आरोग्य संघटनेला एखाद्या देशाला दंड किंवा सक्ती करण्याचा अधिकार नाही. एकाच व्यासपीठावर सर्व देशांना आणण्याचा संघटनेचा प्रयत्न असतो. सामान्य लोकांसाठी स्वास्थ्याचा अधिकार देण्यासाठी सरकारने आरोग्यासाठी सर्वाधिक निधी खर्च करावा. आरोग्य साक्षरता महत्त्वाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सबळीकरण झाले तरच गरजूंना चांगल्या आरोग्याचा लाभ मिळेल. लोकांनी अधिकृत स्रोतांच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले.
‘गावी’कडून लस वितरणात समानता
डॉ. रंजना म्हणाल्या, ‘‘थायलंड व व्हिएतनाममध्ये संसर्ग रोखण्याचा परंपरा असून, तेथील नागरिकांनी त्या आत्मसात केल्या आहेत.
आपल्याकडे त्या असल्या तरी आपण त्या विसरून गेलो आहोत. लसीला संबंधित देशातील प्राधिकरण मान्यता देते. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्याशिवाय ‘गावी’ या संस्थेकडून लसीचे वितरण जगभरात वितरण होत नाही. लसीवर पूर्वीपासून संशोधन सुरू होते. वीस टक्के लस गरीब देशांना मोफत मिळेल. संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांत समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे.’’ श्री. देशमुख यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देत व्याख्यानमालेच्या उपक्रमाचे कौतुक केले. श्री. देऊळगावकर यांनी व्याख्यानमालेचा इतिहास सांगत जागतिक तज्ज्ञांचा परिचय करून दिला.
(संपादन-प्रताप अवचार)