जयघोष छत्रपती शिवरायांचा...

photo
photo

हिंगोली : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवराय’ च्‍या गगणभेदी घोषणांनी बुधवारी (ता. १९) हिंगोली शहर दुमदुमले. मिरवणुकीत दुचाकी फेरी, सजीव देखावे, कवायती, लेझीम पथक लक्ष वेधून घेत होते. दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्‍सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवपूजन व पाळणा कार्यक्रम झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये हातात भगवे ध्वज घेऊन हजारो युवक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विसर्जित करण्यात आली. 

लेझीम, झांझपथकाने वेधले लक्ष

त्यानंतर रथामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये हत्ती, रथ, घोडे, लेझीम पथक, महिलांची लाठी-काठी, ढोल पथक, झांझपथक लक्ष वेधून घेत होते. या वेळी शाळा, महाविद्यालयातर्फे देखावे सादर करण्यात आले. भजनी मंडळ, वारकरी, ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. मिरवणुकीत विविध संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. विविध शाळेतील गणवेशात विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेकांच्या डोक्‍यावर फेटे बांधण्यात आले होते. तसेच आकर्षक पेहराव करून युवक सहभागी झाले होते. 

शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक

मिरवणुकीत महिलांची लक्षणीय उपस्‍थिती होती. या वेळी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पोष्ट ऑफिस, आखरे मेडिकल, जवाहरोड मार्गाने गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा गांधी पुतळा त्‍यानंतर अकोला रस्‍त्‍याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीत ठिकठिकाणी पाणी वाटप करण्यात आले. 

घोषणांनी परिसर दुमदुमला

इंदिरा गांधी चौक परिसरात तंजूम संघटनेच्या मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करीत मिठाई, लाडू वाटप करून एकात्मतेचा संदेश दिला. मिरवणुकीत मोठ्या संख्येंने शिवप्रेमी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा दुमदुमत होत्या. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी हिंगोली शहर दुमदुमून गेले होते.


कळमनुरीत जयंती उत्साहात

कळमनुरी : येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय सैन्य दलातील सैनिकांचे सजीव देखावे सादर करीत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी नऊ वाजता मोठा मारुती मंदिर परिसरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. 

सजीव देखावे ठरले आकर्षण

घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार मावळे यांचे सजीव देखावे तसेच भारतीय सैन्यदलातील सैनिकांचे सजीव देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक जुने बसस्थानक येथील जिजाऊ चौक येथे पोचली. त्यानंतर मिरवणुकीचा समारोप नगरपालिका कार्यालय परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. या मिरवणुकीत शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण

वसमत : येथे शिवजयंतीनिमित्त शहरात हुतात्मा बहिर्जी मित्र मंडळाच्या वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांचे आश्वरूढ जिवंत देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक मार्गाने ठिकठिकाणी चहा, फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी मुस्लिम समाजबांधवांकडून मिरवणुकीतील शिवप्रेमींना पिण्याच्या पाण्याची, शरबताची व्यवस्था केली होती. शहरातील सर्वच समाजबांधवानी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण व शिवरायांच्या नावाचा गजराने शहर दुमदुमले. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

औंढा येथे मिरवणुकीने वेधले लक्ष

औंढा नागनाथ : येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महारयांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रथम नगर पंचायत येथे सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली. त्यानंतर प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक नगर पंचायत प्रांगणातून लोकमान्य टिळक चौक, डॉक्टर हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, इंदिरानगर, सावित्रीबाई फुले चौक, जोशी गल्ली मार्गे काढण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com