नगरपालिका करू लागल्या जंतुनाशक औषधीची फवारणी 

प्रशांत बर्दापूरकर
Saturday, 28 March 2020

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अंबाजोगाई नगरपालिकेने स्वयंचलित ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक औषधीची फवारणी सुरू केली आहे. यातून विविध प्रभागांतील रस्त्यांचे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात येत आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) -  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी येथील नगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शुक्रवारी (ता.२७) स्वयंचलित ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक औषधीची फवारणी सुरू करण्यात आली. यातून विविध प्रभागांतील रस्त्यांचे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात येत आहे. 

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वीच हँडपंपाद्वारे फवारणी सुरू करण्यात आली होती; परंतु त्यात मोठा वेळ जात असल्याने शुक्रवारी स्वयंचलित ट्रॅक्टरद्वारे मुख्य रस्ते, प्रभागांतील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाल्या या ठिकाणी औषधी फवारणी करण्यात येत आहे. येथील प्रशांतनगर भागातून याचा प्रारंभ बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष बबन लोमटे, नगरसेवक मनोज लखेरा, महादेव आदमाने, संजय गंभिरे, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, आसेफोद्दीन खतीब, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या उपस्थितीत झाला. लवकरच संपूर्ण अंबाजोगाई शहरात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

मास्क, हँडग्लोव्हज्, सॅनिटायझर, साबण आदी वस्तू पुरविण्यात येतात. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात त्यांना विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष बबन लोमटे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेची यंत्रणा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

घंटागाडीवर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती 
कोरोनाचा संसर्ग आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी व फैलाव रोखण्यासाठी शहरात कचरा गोळा (संकलन) करणाऱ्या घंटागाडीवर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. इतरही वाहनांद्वारे लाऊड स्पीकरवरून नागरिकांना आवाहन करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी सांगितले. 

हेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....

शहरात चार ठिकाणी मिळणार भाजीपाला 
संचारबंदीच्या काळात नागरिकांना भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तू आपापल्या घराजवळ उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व प्रभाग व परिसर यांची चार विभागांत विभागणी केली आहे. या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी केंद्रे सुरू केले आहेत. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सबाबतची आखणीही रोटरी क्लबच्या मदतीने करून देण्यात आल्याचे नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the city of Ambajogai Spraying pesticides