मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका 

ई सकाळ टीम
Friday, 8 January 2021

लातूर जिल्ह्यातील औसा, जळकोट, मदनसुरी, उदगीर, उजनी, बेलकुंड, देवणी येथे ढगाळ वातावरण असून किल्लारी परिसरात तुरळक पाऊस झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील बऱ्याच भागात आज शुक्रवारी (ता.आठ) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, जळकोट, मदनसुरी, उदगीर, उजनी, बेलकुंड, देवणी येथे ढगाळ वातावरण असून किल्लारी परिसरात तुरळक पाऊस झाला. निलंगासह तालुक्यात बुधवारी (ता.सहा) पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात अवकाळी पाऊस सलग दुसऱ्या दिवशी सुरुच आहे. लोहगाव, जायकवाडी,  दावरवाडी, टाकळी राजेराय या भागात ढगाळ वातावरण आहे.

ईमेल हॅक करून लाखोंचा गंडा, वाळूजमधील वर्षा फोर्जिंग कंपनीची फसवणूक

चापानेर परिसरात आज सकाळी पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला झाला. कन्नड तालुक्यात सर्वदूर रिमझिम पाऊस सुरू आहे. यात  गहू, हरभरा, कांदा, कांदा बीजवाई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात पाथरवाला बु, कुरण, वाळकेश्वर,पाथरवाला खु. बळेगाव, आपेगाव, डोमलगाव, गोरी, गांधारी आदी भागांत ढगाळ वातावरण आहे. तसेच हलकासा पाऊस होत आहे. यामुळे ज्वारी पिकाला  फटका बसण्याची शक्यता आहे. 
 

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

मुसळधार पावसाने पिके आडवी : देवणी (जि.लातूर) तालुक्यात बुधवारी (ता. सहा) सायंकाळी सातनंतर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वलांडी महसूल मंडळात बुधवारी १०८ मिमी पाऊस झाला. देवणी महसूल मंडळात ५० मिमी पाऊस तर बोरोळ महसूल मंडळात ३३ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात ६३.६६ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

सध्या उसाची तोड सुरू असून, सर्वत्र चिखल झाला असल्याने पुढील तीन दिवस तरी तोडणी झालेला ऊस फडाबाहेर निघणे कठीण झाले आहे. तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड केली असून, अतिपावसाने सरीत पाणी थांबल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. सर्वच भागात तुरीची कापणी पूर्णत्वास आली. पावसाने तुरीचे कापलेले पीक पाण्यात गेले आहे. वलाडी भागातील सर्वच ओढे नाल्यांना पाणी आले असून, हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने मर रोगाचा धोका निर्माण झाला आहे.   

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy Climate Over Marathwada Aurangabad Marathi News