मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा गहू पेरणीला फटका

सुषेन जाधव
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  • थंडी वाढल्यानंतर रखडलेल्या पेरण्या घेतील वेग 
  • मराठवाड्यातील बहुतांश भागातील स्थिती 
  • थंडी पडली तरच वाढतील गव्हाच्या पेरण्या 

औरंगाबाद : मागील आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मध्येच एखाद्या दिवशी हूडहूडी भरते, तर ढगाळ वातावरणामुळे पून्हा कमी होत आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर झाला असून खासकरुन गहू पेरणीला मोठा फटका बसल्याचे कृषीतज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. 

हेही वाचा - गंगाखेड शिवसेनेचे माजीतालुकाप्रमुख दुचाकी अपघातात ठार

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 16 अंशांच्या वर गेल्याने थंडीची हूडहूडी कमी झाली आहे. गहू पिकासाठी पोषक असणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दोन दिवसांपासून औरंगाबादचे कमाल तापमान वाढून 31 ते 32 अंश सेल्सिअंस तर, किमान 15 ते 16 अंश सेल्सीअस आहे. त्यामुळे गहू पेरणी रखडली आहे. 

हेही वाचा - कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह : बलात्कार की खून?

आठ ते दहा दिवसापासून सातत्याने ढगाळ हवामान असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडाही जाणवतो आहे. बहुतांशी भागात कमाल तापमानही 30 अंशांच्या पुढेच आहे. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात हिमवृष्टी होत असली, तरी उत्तर भारतातही अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नाही. हरियानातील भिवणी येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. दिवाळीनंतर बऱ्यापैकी गुलाबी थंडी सुरू झाली होतीे. मध्यंतरी थंडीचा कडाका किंचितसा वाढला होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी एकदम गायब झाली असून, चक्क ढगाळ हवामान आहे. पावसाची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. कुठे शेकोट्या पेटलेल्या दिसत नाहीत. कोणी स्वेटर, मफलर असे गरम उलनचे कपडे वापरताना दिसत नाहीत. स्वेटर विक्रीच्या दुकानांवरही शुकशुकाट आहे. गव्हाची 50 ते 60 टक्के पेरणी आटोपली असून, कडाक्‍याची थंडी सुरू होताच गव्हाच्या पेरण्यांना कमालीचा वेग येईल, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले. 

कडाक्‍याची थंडी गहू पिकासाठी पोषक असते, जागतिक हवामान बदलाच्या परिणाम हल्ली जास्तच जाणवतो आहे. त्यामुळे थंडी वाढत नाही, थंडीत रब्बी पिके बाळसे धरत असतात. थंडी पडली तरच गव्हाच्या पेरण्या वाढतील. 
- उदय देवळाणकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cloudy Environment Affect Wheat Sowing in Marathwada