साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

सुशांत सांगवे
Thursday, 2 January 2020

उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार आहे; पण याआधीच्या अनेक संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. 

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आले आहे.

यापैकी कोणकोणते नेते रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित राहणार आणि ते उपस्थित राहिले तर साहित्य महामंडळ आणि संमेलनाची आयोजक संस्था त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सन्मान करणार का?, याकडे साहित्यवर्तूळाचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार आहे; पण याआधीच्या अनेक संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे ! 

सांस्कृतिक मंत्र्यांपासून अनेक महत्वाचे नेते या वेळी व्यासपीठावर हजर राहिले आहेत. संमेलनाच्या समारोप सोहळ्यातही असेच चित्र पहायला मिळते. राजकीय नेत्यांच्या गर्दीमुळे व्यासपीठावरील साहित्यिक बाजूला पडत आहेत, अशी नाराजीही वेळोवेळी महामंडळाकडे व्यक्त झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्थेने यंदा राजकीय नेत्यांना रसिक म्हणून संमेलनाला निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे नुकतीच संमेलनाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित राहण्याची विनंती केली जाणार आहे. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

शरद पवार यांनाही अशी विनंती करण्यात आली आहे. याला स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांपर्यंत आम्ही संमेलनाची निमंत्रण पत्रिका पोचवली आहे. निमंत्रण देण्यासाठी अजूनही काहींच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तर काहींना इ-मेलद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत. संमेलनाला येणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तीचा योग्य तो मान-सन्मान राखला जाईल. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही,असेही तावडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

खातेवाटप रखडल्याने अडसर

आधी मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला. त्यानंतर खातेवाटप रखडले. त्यामुळे नेमक्या कोणत्या मंत्र्यांना संमेलनाचे निमंत्रण द्यावे, हा प्रश्न सध्या आयोजकांसमोर आहे. साहित्य संमेलनाला मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्र्याना बोलावले जाते. पण खातेवाटपावेळी अनेक बदल होऊ शकतात. 

हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा  

त्यामुळे खातेवाटप झाल्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्र्यासह इतर महत्वाच्या मंत्र्यांना संमेलनाची निमंत्रण पत्रिका दिली जाणार आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray Invited To Attend Sahitya Sammelan in Osmanabad Maharashtra News