coronavirus - बीडकरांना दिलासा, आणखी तीन स्वॅबही निगेटिव्ह

दत्ता देशमुख
Monday, 30 March 2020

बीड जिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात तिघांना दाखल करून त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले होते. सोमवारी या तिन्ही स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले. यापूर्वीच्या ११ स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह आले.

बीड - कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत आतापर्यंत तरी बीड जिल्हावासीयांचे नशीबच असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या १४ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी (ता. २९) पाठविलेले तीन स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, पुणे, मुंबईसह इतर शहरांतून आलेल्या सर्वांचे मंगळवारपासून (ता. ३१) फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

कोरोनावरील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी चांगली सुरू असून अपवाद वगळता नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक स्थलांतरितांचा जिल्हा असतानाही अद्याप एकही कोरोना संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. दरम्यान, रविवारी बीड जिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात तिघांना दाखल करून त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले होते. सोमवारी या तिन्ही स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले. यापूर्वीच्या ११ स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह आले.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

दरम्यान, कोरोनाचा विषाणू आढळला तर जिल्ह्यात बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी शंभर खाटांचे अलगीकरण कक्ष उभारण्यात आले असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी करण्यात येत आहे. यात ७०० खाटांची क्षमता असेल. 

हेही वाचा - मजुरांचे जत्थे पायीच निघाले गावाच्या प्रवासाला

बाहेरून आलेल्यांचे आजपासून फेरसर्वेक्षण 
पुणे - मुंबईसह इतर शहरांतून आलेल्यांची जिल्ह्यात दाखल होताच विविध रस्त्यांवर उभारलेल्या १४ चेक नाक्यांवर स्क्रीनिंग करण्यात आली. त्यानंतर गावपातळीवर आशा, अंगणवाडी सेविकांकडून त्यांची नोंदणी करण्यात आली. काहींना होम क्वारंटाइन केले आहे. आता या सर्वांचे मंगळवारपासून फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्याचे चेक नाके बंद झाल्यानंतरही काही लोक आले आहेत. या सर्वांचेच आता नव्याने सर्वेक्षण होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfort to Beedkar: Three more swabs also negative