नुकसानीचे अनुदान तुटपुंजे, उमरगा तालुक्याच्या ५६ गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात ५४ लाख जमा

अविनाश काळे
Friday, 27 November 2020

अतिवृष्टीने पीक नुकसानीबरोबरच शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घरांच्या पडझडीही झाल्या.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीने पीक नुकसानीबरोबरच शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घरांच्या पडझडीही झाल्या. नुकसानीनंतर विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा, परंतू जमीन खरडून गेलेल्या नुकसानीची रक्कम वजनदार मिळू शकली नसल्याने शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी अधिकची रक्कम खर्च करावी लागत आहे. दरम्यान जमिनीच्या नुकसानीपोटी ५४ लाख २५ हजार तर घर पडझडी पोटी सात लाख ऐंशी हजाराचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.

उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने नदी, ओढे ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याच्या दाबाने शेतजमीन खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकी झाल्या. विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी व मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदतीची मोठी अपेक्षा होती. मात्र मदत कमी प्रमाणात मिळाली. हेक्टरी ३७ हजार पाचशे रुपये मदत जाहिर करण्यात आली. काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे. तेथे दगड गोट्याचा खच आहे. तो भरून काढण्यासाठी खर्च मोठा आहे. तरी ही शासकीय म्हणून शेतकऱ्यांना हातभार लावणारा आहे.

दरम्यान अनंतपूर, आष्टा (जहागीर), एकूरगावाडी, एकोंडी (जहागीर), औराद, कंटेकूर, कडदोरा, कदमापूर, कदेर, कराळी, कलदेवनिंबाळा, कवठा, कसगी, कसगीवाडी, काटेवाडी, काळालिंबाळा, कुन्हाळी, कोथळी, कोरेगाव, कोळसूर (गुंजोटी), कोळेवाडी, गुंजोटी, गुंजोटीवाडी, गुगळगाव, चंडकाळ, चिंचोली (जहागीर), चिंचोली (भूयार), चिंचकोट, चिरेवाडी, जकेकुर, जगदाळवाडी, जवळगाबेट, तलमोड, तुरोरी, थोरलीवाडी, दगडधानोरा, दावलमलिकवाडी, दुधनाळ, धाकटीवाडी, नाईचाकूर, नागराळ, नारंगवाडी, पळसगांव, पेठसांगवी, बलसूर, बाबळसूर, बेडगा, बोरी, भिकारसांगवी, भुसणी, मूरळी, मुरूम, माडज, मातोळा, रामपूर, मुळज, समुद्राळ, हिप्परगाराव या ५६ गावांना जमीन खरडून गेलेल्या नुकसानीची एकुण ५४ लाख २५ हजार  ६२५ इतकी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविण्यात आली आहे तर घराच्या पडझडीची प्रत्येकी घराला सहा हजाराचे अनुदान याप्रमाणे एकोणीस गावांतील १३० लोकांना देण्यात आले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensation Deposited Into Farmers Of Umarga's 56 Villages Osmanabad News