एकुलता एक मुलगा गेला सोडून, काम आटोपून निघालेल्या तरुणाला कंटेनरने चिरडले

दीपक सोळंके
Tuesday, 12 January 2021

कलीम हा आई वडिलांना नऊ वर्षांनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता.

भोकरदन (जि.जालना) : कंटेनर ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तरुणाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१२) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटलसमोर घडली. शेख कलीम शेख रईस (वय १८,  रा.उस्मानपेठ, भोकरदन) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील उस्मानपेठ भागातील रहिवाशी शेख कलीम हा तरुण काही कामानिमित्त शहरातील जालना रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटल परिसरात आला होता. येथील काम आटोपून तो दुचाकीने निघाला असता भोकरदनहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेनंतर कलीम हा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास अर्धा तास मृतदेह जागेवर पडून होता. यादरम्यान दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा सुरू असून, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.  

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

आई वडिलांना होता एकुलता एक
दरम्यान या अपघातात ठार कलीम हा आई वडिलांना नऊ वर्षांनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Container Truck Crushed Youth In Bhokardan Jalna Latest News