esakal | बीडचा नादच करायचा नाय... विद्यार्थ्यांवर कॉप्यांचा पाऊस!
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

बीड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेचा गवगवा करण्यात आला, पण बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला मंगळवारी कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रांजवळ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा गोतावळा पाहायला मिळाला.

बीडचा नादच करायचा नाय... विद्यार्थ्यांवर कॉप्यांचा पाऊस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर कासार (जि. बीड) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत तालुक्यात मंगळवारी (ता.18) बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला सर्वच सात केंद्रावर सर्रास कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट दिसून आला.

काही केंद्रावर विद्यार्थिनी आसनव्यवस्था नसल्याने जमिनीवर बसून परीक्षा देण्याची दुर्दैवी वेळ शिक्षण विभाग, बोर्डाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांवर आली होती. त्यामुळे तालुक्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला बट्ट्याबोळ झाला असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

तालुक्यात बारावीच्या परीक्षेला कालिका देवी महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, आदर्श विद्यालय खलापुरी, पाडळी विद्यालय, जालिंदर विद्यालय रायमोह, रेणुका विद्यालय मानूर, अतुल कनिष्ठ विद्यालय रायमोह या सात केंद्रांवर सुरवात झाली आहे. पहिल्याच इंग्रजी विषयाला दोन हजार 251 विद्यार्थी बसले होते. त्यात दोन हजार 132 विद्यार्थी हजर हाते. 119 विद्यार्थी गैरहजर राहिले. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी न करताच केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धा तासात विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी केंद्राभोवती गर्दी करून थेट कॉपी पुरविण्यात येत असल्याचे दिसून आले. दोन केंद्रांवर समोरील गेट बंद करून विद्यार्थ्यांना खुलेआम कॉपीला परवाना दिल्याचे दिसून येत होते. बाहेरून खिडकीला दोरी बांधून दुसऱ्या मजल्यावरील विद्यार्थ्यांना नातेवाइकांमार्फत सर्रास कॉपीचा पुरवठा करण्यात येत होता. 

हेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....

एका केंद्रावर कॉपी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या. त्या जाळून टाकण्यात येत होत्या. एका केंद्राच्या इमारतीचे वरच्या मजल्यावर बांधकाम सुरू असल्याने सतत आवाजाचा अडथळा निर्माण झाला. एका केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याने जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ आली. दुर्गंधी पसरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

भरारी पथक कुठे? 
तालुक्यातील सात केंद्रांवर बैठे पथक, भरारी पथकाची नियुक्त करण्यात आली होती. मात्र, हे पथक कुचकामी ठरत आहे. पहिल्या दिवशी जिल्हास्तरावरील पथकाने भेट दिली नसल्याचे सर्व केंद्रांवर आलबेल होते. त्यामुळे तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्तीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून आले. 

loading image