esakal | वृत्तपत्रांवरील लोकविश्‍वास, कसा? तो वाचलाच पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

वृत्तपत्रांनी गेल्या शंभर वर्षात जो लोकविश्‍वास निर्माण केला आहे, तो इतर कोणत्याही माध्यमांना निर्माण करता आला नाही. लोक दूरदर्शन आवडीने पाहतील; परंतु विश्‍वास मात्र वृत्तपत्रावरच ठेवतील. 

वृत्तपत्रांवरील लोकविश्‍वास, कसा? तो वाचलाच पाहिजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनामुळे आज सारे विश्‍व स्तब्ध झालेले आहे. जग अशाश्‍वत अनिश्‍चित आणि अविश्‍वासाच्या अवस्थेतून भयक्रमण करीत आहे. जागृतीला काळ्या भयान निद्रेने वेढलेल्या या भयकंपीत वातावरणात पूर्व क्षितिजावर आशेच्या आत्मविश्‍वासाच्या सूर्य किरणांची आशा आहे. हतप्रभ, गलितगात्र आणि हतबल झालेल्या मनाला पुन्हा नवचैतन्याचे नवांकूर पुन्हा एकदा फुटायचे असतील तर वाचनाला दुसरा कोणताच पर्याय नाही.

वाचन मनाला सकस सामर्थ्य प्रदान करणारे एकमेव वैचारिक संसाधन आहे. वाचनाच्या सवयीतूनच चिंतन, मनन, विचार आणि विवेकाचे सामर्थ्य मन, बुद्धी, भावना आणि चेतनेला प्राप्त होते. वाचन अशांत भावनांचे संयमी आणि संयत व्यवस्थापन करते. वाचनामुळेच निराशलेल्या, गलितगात्र मनाला नवकर्माची पालवी फुटते आणि पुन्हा एकदा नवसर्जनाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. वाचनाची संस्कृती, सव्यास आणि सवय, विचार आणि विवेकाचे डोळे नीतळ आणि स्वच्छ करण्यास मदत करते.

हेही वाचा - बारा जण निलंग्यात आलेच कसे? मंत्री देशमुखांची चाैकशीची मागणी

वर्तमानपत्राचे वाचन हाच दिलासा
सद्यस्थितीत वर्तमानपत्राचे वाचन हा भांबावलेल्या मनाला दिलासा देणारा एकमेव दीपस्तंभ आहे. दृक, श्राव्य माध्यमे या संकट अवास्तवाचे भयकंपीत वातावरण तयार करीत आहेत. अशा अस्थिर वातावरणात वर्तमानपत्राचे वाचन हा एकमेव दिलासा ठरतो. वृत्तपत्रे शक्ती आणि सामर्थ्याचे समाजभान ठेवणारे विश्‍वसनीय लोकमाध्यम आहे. प्राप्त परिस्थितीत लोक विश्‍वासाला पात्र ठरणारा एकमेव आधार म्हणून लोक वृत्तपत्राकडे मोठ्या विश्‍वासाने पहात आहेत.

वृत्तपत्रे विश्‍वासू आधार
वर्तमानपत्रे लोक मनाला उभारीदेण्याचे कार्य करू शकतील. दृश्‍य माध्यमांचा मनोरंजन हा प्रधान हेतू राहत आला आहे. न्याय, अन्यायाचा त्यांच्याशी संबंध कधी आलाच नाही. अशा संभ्रमावस्थेत वर्तमानपत्र घेऊन वाचणे हा मन स्थीर ठेवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. वर्तमानपत्रे केवळ घटना वर्णीत नसतात तर त्या घटनेच्या कारणमीमांसा आणि वास्तवाचे विश्‍लेषण अत्यंत वास्तववादी करतात. म्हणून लोकांना वृत्तपत्रे विश्‍वासू आधार वाटतात. वाचकांची करंगळी धरून वृत्तपत्रे वाचकांना प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. लोकांना घरातील वडीलधाऱ्या माणसासारखाच या वर्तमानपत्रांचा आधार वाटतो.

हे देखील वाचा - आम्ही जन्मापासूनच लॉकडाउनमध्ये हाय...! अंध दाम्पत्य

विश्‍वासच वृत्तपत्रांचे सामर्थ्य
वृत्तपत्रे घटना, घडामोडीचे समीक्षक आणि साक्षेपी वर्णन करतात. शासन आणि मदांधाच्या काही अपप्रवृत्तीवर, निरंकुश आणि अनिर्बंध वृत्ती, प्रवृत्तीवर अंकुश ठेवतात म्हणून लोकमनात वृत्तपत्रांबद्दल एक विश्‍वास असतो. वृत्तपत्रे समाज आणि व्यक्ती हिताची समर्थ कैवारी असतात म्हणून लोकांना सुरक्षेची भावना मनात निर्माण होते. म्हणून आजच्या भयकंपीत वातावरणात वर्तमानपत्रांच्या वाचनाची सवयच दिलासा देणारे आहे. लोकांच्या मनातील हा विश्‍वासच वृत्तपत्रांचे सामर्थ्य आहे, हे निर्विवाद सत्य आहे. 

येथे क्लिक करा - Video : बांधकाम व्यावसायिक बियानींचा तीन हजार कुटुंबांस मदतीचा हात

शासन, समाज आणि वृत्तपत्रे यांच्या समन्वित सामर्थ्यातून ही विनाशकारी आपदा (संकट) आपण निष्प्रभ करू शकतो. हा आशावाद आजही लोकमनात ठाम आहे. आपण आपल्या घरी बसून वर्तमानपत्रांच्या वाचन चिंतनातून लोकजागृती करुया आणि कोरोनाची ही भिती कायमची गाढून टाकूया.
- डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक.