कोरोना : स्थलांतरीत चार हजार नागरिक पोचले गावी

संजय कापसे / सिताराम देशमुख
Saturday, 28 March 2020

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात  कामासाठी स्थलांतर करणारे मजूर व कामगारांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने गावाकडे परतण्याची तयारी चालवली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कामासाठी मुंबई, पुणे येथे स्थलांतर करणारे तालुक्यातील चार हजार १६ नागरिक शुक्रवारपर्यंत (ता.२७) आपल्या गावी परत आले आहेत. त्‍यांना गावपातळीवर आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शहरी भागात जमावबंदी अमलात आणली आहे. नागरिकांनी घरामध्ये राहूनच सुरक्षितता बाळगावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात  कामासाठी स्थलांतर करणारे मजूर व कामगारांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने गावाकडे परतण्याची तयारी चालवली आहे.

हेही वाचाट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक

प्रत्येक स्थलांतरीत नागरिकांची तपासणी

 जनता कर्फ्यूपासून या स्थलांतरित नागरिकांनी आपापल्या गावी परतणे सुरू केले आहे. मुंबई-पुणे भागातून गावाकडे परतलेल्या ग्रामीण भागातील प्रत्येक मजूर व कामगारापासून या आजाराचा फैलाव होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात परतलेल्या प्रत्येक महिला व ग्रामस्थांची नोंद संकलित करून त्यांना सर्दी, खोकला, पडसे हा आजार आहे किंवा नाही याची खातरजमा करीत उपचार हाती घेण्यात आले आहेत.

कळमनुरी शहरातील १३८ जणांचा समावेश

तालुक्यात शुक्रवारपर्यंत आखाडा बाळापूर प्राथमिक केंद्रांतर्गत ६९२, डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्र ५३५, मसोड ८३९, पोतरा ७५५, रामेश्वर तांडा ५६५, वाकोडी ६३० असे एकूण चार हजार सोळा मजूर व कामगार आपापल्या गावी परत आले आहेत. मुंबई, पुणे येथून परतलेल्या मजूर व कामगारांची सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले असून शहरामध्येही १३८ जण परत आले असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या नागरिकांना कुठल्याही आजारा संदर्भात शंका वाटल्यास त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्याकरिता आरोग्य विभागाने रॅपिड ऍक्शन पथक तैनात केले आहे. या पथकाच्या माध्यमातून आजारी रुग्णाला गावपातळीवरच उपचाराची सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे क्लिक करावाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन
 
गोरेगावात १५० रुग्णांची मोफत तपासणी 

गोरेगाव (ता. सेनगाव) : ग्रामीण भागातील खासगी दवाखाने बंद केल्याने रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. परंतु, गोरेगाव येथील खासगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ. दीपक पाटील गोरेगावकर यांनी विविध आजाराच्या दीडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. कोरोना आजार आटोक्यात येईपर्यंत मोफत आरोग्य सेवा सुरू राहील असे डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. 

जंतनाशक फवारणी 

या कार्याबद्दल डॉ. दिपक यांचे गावातुन कौतुक होत आहे. तसेच येथील डॉ. रवि पाटील गोरेगावकर व गजानन गिरे यांनी स्वखर्चातुन गावात जंतनाशक धुर फवारणी केली आहे. कै. निवृत्ती पाटील शिक्षण व वैद्यकीय सेवा प्रसारक सस्था गोरेगाव व शिव हॉस्पिटल यांच्या वतीने गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून कोरोना विषाणूबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. या वेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. श्रीमनवार, श्री. तुराफभाई, दिलीप कावरखे, जगन कावरखे, गजानन गिरे, गजानन कावरखे, मोईन पठाण, दौलत भाई, शिकंदर, रामा कांबळे, सीताराम कावरखे, शिवाजी पाटील, नंदू रवणे, राजू गायकवाड, सोपान रणबावले आदींची उपस्‍थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Four thousand citizens have arrived