कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ! उमरग्यात दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे धोक्याची शक्यता

अविनाश काळे
Saturday, 14 November 2020

 कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू होऊन सात महिन्याच्या कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ५८ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबातील नातेवाईकावर यंदाची दिवाळी साधेपणानेच साजरी करण्याची वेळ आली आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू होऊन सात महिन्याच्या कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ५८ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबातील नातेवाईकावर यंदाची दिवाळी साधेपणानेच साजरी करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र दिवाळीच्या सणानिमित्त झालेल्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान बाधित झालेल्या जवळपास २५ व्यक्तींवर गोडधोडविना रूग्णालयात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. 

Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

संपूर्ण जिल्ह्यात सर्वप्रथम उमरगा तालुक्यात कोरोना संसर्गाची एन्ट्री एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. दोन आकडी संख्येप्रमाणे वाटचाल करत तीन आकडी त्यानंतर तर चक्क दोन हजाराचा टप्पा ओलांडला गेला. गेल्या सात महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासुन संसर्गाचा वेग सुरू झाला आणि तो तब्बल साडेतीन महिन्यापर्यंत सुरू राहिला.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला आणि आता त्याच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत दोन हजार ११३ पॉझिटिव्ह रूग्ण संख्या झाली असुन शहरात ९३२ तर ग्रामीण भागात एक हजार १२८ रुग्णांची नोंद आहे. त्यातील ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास दोन हजार जणांनी मोठ्या धैर्याने उपचाराला सामोरे जात कोरोनावर मात केली आहे. 

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

बाधितांची दिवाळी रुग्णालयात !
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी संसर्ग झालेल्या बऱ्याच रूग्णांना मानसिक व आर्थिक फटका बसला आहे.  सरकारी यंत्रणाही सक्रिय काम केल्याने उपचार खर्च कमी झाला.  लागले. बऱ्याच रुग्णांना गंभीर स्थितीतून बाहेर येण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले. ५८ जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी कडवटच आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या तोंडावर बाधित झालेल्या लोकांना उपचारासाठी सरकारी व खाजगी रुग्णालयात जावे लागले. तेलकट, अंबटचे पथ्य बाधितांना असल्याने त्यांची दिवाळी गोडधोडविना होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांसाठी खास सकस गोड पदार्थाचे नियोजन केलेले नव्हते. सध्या सरकारी कोविडमध्ये पंधरा रुग्ण उपचार घेत असून शनिवारच्या तपासणीत आढळून आलेले आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जवळपास दहा रुग्ण आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Infection Slow Down In Umarga Osmanabad News