मालेगावच्या बंदोबस्तातून आले कोरोनाग्रस्त जवान पळून : उपचार सुरू, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

मालेगाव बंदोबस्तासाठी गेलेल्या एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची बाधा होत असल्याने बंदोबस्तावर असलेले दोन जवान भितीपोटी मालेगाव येथून पळून जालना येथे आले. जालना येथे आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली असता, ते कोरोना बाधित आढळून आले.

जालना : मालेगाव येथून जालना येथे परतलेल्या एसआरपीएफच्या दोन जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, हे दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तातून पळून आले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक श्री. जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात या दोन जवानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे. 

महत्त्वाची बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या

मालेगाव येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे मालेगाव बंदोबस्तासाठी जालना येथील एसआरपीएफच्या दोन कंपन्या गेलेल्या आहेत. यात एसआरपीएफची सी कंपनी ही पाच एप्रिल रोजी मालेगाव येथे फिक्स पाॅंईट बंदोबस्ताच्या कामी गेली आहे. या कंपनीत तीन अधिकारी आणि 90 जवान आहेत.

याच सी कंपनीमधील अनेक जवानांना कोरोनाची बाधा झाली असून, नाशिक जिल्ह्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जालना एसआरपीएफची दुसरी बी कंपनी ही कायदा आणि सुव्यवस्था बंदोबस्तासाठी 19 एप्रिल रोजी मालेगाव येथे गेली आहे. या कंपनी तीन अधिकारी आणि 90 जवान आहेत.

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

दरम्यान, मालेगाव बंदोबस्तासाठी गेलेल्या एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची बाधा होत असल्याने बंदोबस्तावर असलेले दोन जवान भितीपोटी मालेगाव येथून पळून जालना येथे आले. जालना येथे आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली असता, ते कोरोना बाधित आढळून आले.

त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, एसआरपीएफच्या बंदोबस्तातून अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता पळून आल्याने त्या दोन जवानांवर सोमवारी (ता.सहा) शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एसआरपीएफमध्ये खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive SRPF Cops Charged For Skip The Duty Without Intimation