शहागड येथील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह 

महेश गायकवाड
Tuesday, 7 April 2020

 शहागड (ता.अंबड) येथील २६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता उर्वरित २० व्यक्तींचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुखीनगर भागातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असून, त्यापैकी ४४ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जालना -  शहागड (ता.अंबड) येथील २६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आता उर्वरित २० व्यक्तींचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुखीनगर भागातील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असून, त्यापैकी ४४ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली आहे. 

शहरातील दुखीनगर भागातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी (ता.सहा) तपासणीअंती आढळून आले. या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६१ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. त्यापैकी ४४ व्यक्तींच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे; तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांचा बाधित महिलेशी जवळचा संपर्क आला होता. अशा १७ कर्मचाऱ्यांनाही अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली आहे.

अलगीकरण कक्षात सध्या १३८ जण 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात सध्या १३८ जण दाखल आहेत. यातील ५२ जणांना मंगळवारी दाखल करण्यात आहे. तर आठ जणांना अलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण भरती केलेल्या २६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 

दुखीनगर भागाच्या सीमा सील 

शहरातील दुखीनगर येथील महिलेला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता तत्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचा एक भाग म्हणून दुखीनगर येथील एक हजार कुटुंबांची पुढील १४ दिवस २० पथकांद्वारे रोज तपासणी केली जाणार आहे; तसेच दुखीनगरमध्ये प्रवेश करणारे २८ मार्गही सील करण्यात असले आहेत. तर २० चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna