esakal | जालन्यात अकरा जणांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

अकराजण कोरोनामुक्त झाले, या रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालन्यात अकरा जणांची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना - जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरा सहा तर शनिवारी एक असे सात जणांचे  कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले.  दरम्यान, अकराजण कोरोनामुक्त झाले, या रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर करीत असलेल्या उपचाराला दिवसेंदिवस यश मिळत असून शुक्रवारी आठ रुग्ण बरे झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अकरा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील दोन जवान, जुना जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील तीन कर्मचारी, घनसावंगी तालुक्यातील पीरगॅबवाडी येथील पाच व रांजणी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

दरम्यान, शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरा नव्याने आढळून आलेल्या सहा रुग्णांमध्ये शहरातील साईनाथनगरमधील एक, धावडा (ता. भोकरदन) येथील एक, घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील तीन आणि मंठा तालुक्यातील नानसी पुनर्वसन येथील एका व्यक्तींचा समावेश आहे. तर शनिवारी मठपिंपळगाव येथील  महिला कोरोनाबाधित आढळली. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १२४ झाला असून त्यापैकी ४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ८०  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात ४०२ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण

कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात ५९ व्यक्ती भरती आहेत. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ४०२ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 
आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत २ हजार ६३२ नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यापैकी २ हजार ४६६ नमुन्यांचे निगेटिव्ह, तर १२३ पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी अलगीकरण करण्यात आलेल्यांमध्ये जालना शहरातील संत रामदास हॉस्टेलमध्ये ३६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २४, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २५, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २० व पोलिस प्रशिक्षण केंद्रात १०९ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ३, जाफराबादमधील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये १४, तर राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे १२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २०, तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३७ व्यक्ती अलगीकरणात आहेत. घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १३, अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ३२, मंठ्याच्या मॉडेल स्कूल येथे ४८ आणि बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ९ व्यक्ती अलगीकरणात आहेत. 

  • जालना कोरोना अपडेट 
  • एकुण बाधित  : १२४ 
  • बरे झाले  : ४४ 
  • उपचार सुरू  : ८० 
  • मृत्यू   : निरंक