जालन्यात दहा रुग्णांची कोरोनावर मात

महेश गायकवाड
Friday, 26 June 2020

जिल्ह्यात गुरुवारी (ता.२५) नऊ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चारशेच्या पार झाला. तर कोविड हॉस्पिटलमधील दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना -  जिल्ह्यात गुरुवारी (ता.२५) नऊ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चारशेच्या पार झाला. तर कोविड हॉस्पिटलमधील दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२४) मृत्यू झालेल्या जालना शहरातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा तेरावा बळी गेला आहे. 

जालना शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढत आहे. जालना शहरातील सदर बाजार परिसरातील ५५ वर्षीय महिलेचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी गेला आहे. ही महिला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने बुधवारी जिल्हा रुग्णालयात भरती झाली होती.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाला ६१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर नऊजणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. यामध्ये जालना शहरातील हनुमाननगर, सदर बाजार, कालीकुर्ती, वैभव कॉलनी येथील प्रत्येकी एक, जिल्हा सरकारी रुग्णालय निवासस्थानातील एक आणि जालना तालुक्यातील भाटेपुरी व जाफराबाद तालुक्यातील भारज येथील एक व जिल्हा क्षयरोग कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

दरम्यान, गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या दहाजणांमध्ये शहरातील गुडलागल्ली भागातील तीन, राज्य राखीव दलातील तीन जवान, भाग्यनगर भागातील दोन, बालाजीनगरमधील एक व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे. गुरुवारी वाढलेल्या रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ४०७ झाला असून त्यापैकी २८७ जण बरे झाले आहेत. सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात २६५ व्यक्तींचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २६५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात १४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २७, संत रामदास वसतिगृहात २२, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २६, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ६०, परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ५, अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १ व शासकीय मुलींच्या वसतिगृहात ११ व्यक्ती अलगीकरणात आहेत. बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ४ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये २५, जाफराबाद शहरात हिंदुस्थान मंगल कार्यालयात ९, टेंभुर्णी येथील जे.बी.के. विद्यालयात २८ व ईबीके विद्यालयात ३० व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna