जालन्यात अकरा जण कोरोनामुक्त

महेश गायकवाड
Saturday, 4 July 2020

दिवसभरात ३२ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात सर्वाधिक रुग्ण जालना शहरातील आहेत. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील अकरा जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना - गेल्या दोन आठवड्यांपासून जालना शहरात रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गुरुवारी साठवर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी (ता.तीन) शहरातील पुन्हा तिघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात सर्वाधिक रुग्ण जालना शहरातील आहेत. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील अकरा जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना शहरात झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता ६५२ झाला आहे. त्यातील ३७९ रुग्ण बरे झाले असून सध्या २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असले तरी बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३२ रुग्णांमध्ये मूर्तीवेस भागातील पाच, अग्रसेननगरमधील दोन, कादराबाद येथील चार, पाणीवेस, एसटी कॉलनी, गोपालपुरा, चंदनझिरा, शोला चौक, सुवर्णकारनगर, सुभद्रानगर व आरपी रोडवरील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर भोकरदन येथील कैलास मंगल कार्यालय परिसरातील चार, तुळजाभवानीनगरमधील तीन, मसनापूर, वालसा वडाळा व धावडा येथील प्रत्येकी एक, जाफराबाद शहरातील एक व अंबडमधील शारदानगर येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

कोविड हॉस्‍पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अकरा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जालना शहरातील नाथबाबा गल्लीतील तीन, कादराबाद, कडबी मोहल्ला व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील एक, अंबड तालुक्यातील गोंदी येथील दोन व भोकरदन शहरातील नूतन कॉलनीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जालना शहरातील मृत्यू झालेल्या तीन रुग्णामंध्ये सुवर्णकारनगरमधील ८५ वर्षीय पुरुष, मोदीखाना परिसरातील ४५ वर्षीय महिला व जांगडानगरमधील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सुवर्णकारनगरमधील रुग्णास न्यूमोनियाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच त्यांच्या किडनी निकामी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्याचा सकाळी मृत्यू झाला. तर मोदीखाना येथील महिलेस उच्च रक्तदाब, मधुमेह व श्‍वसनाचा त्रास होता. तिचा शहरातील शहरातील डेडिकेटेड कोविड हॉस्‍पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर जांगडानगरमधील रुग्णासही उच्च रक्तदाब, मधुमेह, श्‍वसनाचा त्रास व न्यूमोनियाचा आजार होता. त्याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. शुक्रवारी वाढलेल्या रुग्णांमुळे एकूण बाधितांची संख्या ६५२ झाली असून त्यापैकी ३७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर २२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna