जालन्यात सोळाशेपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त 

उमेश वाघमारे 
Thursday, 6 August 2020

जिल्ह्यात बाधितांचा आलेख वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचा आलेखही उंचावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक हजार ६२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बुधवारी (ता.पाच) २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना - जिल्ह्यात बाधितांचा आलेख वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचा आलेखही उंचावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक हजार ६२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बुधवारी (ता.पाच) २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, ८५ कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही दोन हजार ५८० झाली आहे. तर एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७६ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या ८८३ जणांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात कोरोनाचे हातपाय पसरणे सुरू आहे. परिणामी प्रत्येक दिवसाला कोरोनाचा आलेख वाढता आहे. त्यातच कोरोनामुळे होणारे मृत्यूही थांबण्यास तयार नाहीत. बुधवारी शहरातील कादराबाद परिसरातील एका ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेली आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, नव्याने ८५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात मंठा शहरातील चारजण, जालना शहरातील भाग्यनगर येथील तीन, रामनगर, भीमनगर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी दोनजण, गांधी चमन, नया बाजार, सामान्य रुग्णालय निवासस्थान, सोनलनगर, साईनाथनगर, जेईएस महाविद्यालय परिसर, भवानीनगर, समर्थनगर येथील प्रत्येकी एक, मंठा तालुक्यातील गुळखंड व पाटोदा येथील प्रत्येकी एकजण, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील एकजण असे एकूण २४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जालना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण एक हजार ६२१ जण उपचाराअंती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. 

लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे 

लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६४ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी २०४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ८८० वाहने ही जप्त करण्यात आले आहेत. आयपीसी १८८ प्रमाणे न्यायालयाने ठोठावलेला एक लाख सात हजार रुपयांचा दंड, २६ हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली सात लाख ९६ हजार ९३० रुपये दंड असा एकूण नऊ लाख ३० हजार ७३८ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna