जालना कोरोना @ १४ 

महेश गायकवाड
Wednesday, 13 May 2020

जालन्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी (ता.१२) राज्य राखीव दलातील आणखी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे.

जालना - जालन्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी (ता.१२) राज्य राखीव दलातील आणखी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली असून, यामध्ये सहा रुग्ण हे राज्य राखीव दलातील जवान आहेत. ते सर्वजण मालेगावच्या बंदोबस्तावरून शहरात परतले होते. 

जिल्ह्यात ता.सहा एप्रिल रोजी पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली. त्यानंतर दोन आठवड्यांनंतर परतूर तालुक्यातील एक महिलाबाधित निघाली. या दोन्ही महिलांवर यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्या. परतूर येथील महिलेला सुटी झाली. तर दुसऱ्या महिलेला इतर आजारामुळे सुटी देण्यात आली नाही. या यशानंतर जिल्हा प्रशासन मोकळा श्वास घेत असताना आठवडाभरानंतर म्हणजेच ता.एक मेपासून जिल्ह्याची चिंता सतत वाढत चालली आहे.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

गेल्या बारा दिवसांत बारा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, यात सर्वाधिक रुग्ण हे राज्य राखीव दलातील जवान आहेत. मालेगाव येथून जिल्ह्यात परतलेले राज्य राखीव दलातील जवान कोरोनाबाधित आढळून येत आहे. बंदोबस्‍तावरून परतलेल्यांपैकी सहा जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

जालन्यातील राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या मालेगाव येथे बंदोबस्‍तासाठी गेल्या होत्या. त्यातील ‘सी’ कंपनी जालन्यात परतली आहे. यातील काही जवांनाना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तर काहींना भोकरदन येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेला जवान पोलिस प्रशिक्षण केंद्रातील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे. 

  • तारीखनिहाय आढळलेले १४ रुग्ण 
  • ता. ६ एप्रिल : दुखीनगर येथील ६५ वर्षीय महिला बाधित 
  • ता.२१ एप्रिल : शिरोडा (ता.परतूर) येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह 
  • ता.१ मे :पारध (ता.भोकरदन) येथे गुजरातमधून आलेली युवती पॉझिटिव्ह 
  • ता.२ मे :परतूर तालुक्यात मुंबईहून आलेला युवक, मालेगाव बंदोबस्तावरून परतलेल्या चार जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह 
  • ता.१० मे : कानडगावात (ता.अंबड) मुंबईवरून आलेले तीनपैकी दोन जण पॉझिटिव्ह, 
  • जालना शहरातील इंदेवाडीतील रंगनाथनगर भागातील गर्भवती पॉझिटिव्ह 
  • ता.११ मे : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व राज्य राखीव दलाचा जवान 
  • ता.१२ मे : राज्य राखीव दलातील पुन्हा एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna