कोरोनाचा खतरा, रुग्ण झाले सतरा

उमेश वाघमारे 
Thursday, 14 May 2020

जालन्यात बुधवारी तीन नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबई येथून परतलेला एक तरुण, मालेगाव बंदोबस्तातून परतलेला एक ‘एसआरपीएफ’चा जवान आणि परतूर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे.

जालना -  जालन्यात बुधवारी (ता. १३) तीन नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबई येथून परतलेला एक तरुण, मालेगाव बंदोबस्तातून परतलेला एक ‘एसआरपीएफ’चा जवान आणि परतूर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे आता जालना जिल्ह्यात एकूण १७ रुग्ण झाले आहेत. पैकी दोन महिलांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी बुधवारी (ता.१३) दिली. आतापर्यंत आढळलेले बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण हे इतर जिल्ह्यांतून जालना जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. 

जालना जिल्ह्यात आतापर्यंत १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील जवळपास सर्व रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यात पुणे, गुजरात, मुंबई आणि मालेगाव येथून आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. यात मुंबई येथून आलेले चारजण, मालेगाव येथून बंदोबस्तावरून आलेले राज्य राखीव दलातील सहा कर्मचारी, गुजरात येथून आलेली एक तरुणीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक परिचारिका, रंगनाथनगर येथील एक गर्भवती महिलाही कोरोनाबाधित आहे. 

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

दरम्यान, शहरातील दुखीनगर येथील ६५ वर्षीय महिला ही कोरोनाबाधित आढळली होती. उपचारानंतर ती कोरोनामुक्त झाली असून तिच्या इतर आजारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत. तर परतूर तालुक्यातील शिरोडा येथील कोरोनाबाधित महिला कोरोनामुक्त झाली असून, तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

मुंबई येथून परतलेल्या रामनगर परिसरातील एक तरुणही बुधवारी (ता. १३) कोरोनाबाधित असल्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त झाला आहे; तसेच मालेगाव बंदोबस्तावरून परतलेला राज्य राखीव दलाचा एक जवान आणि परतूर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जालन्यात इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ वर जाऊन पोचली आहे. परिणामी चिंतेत भर पडली असून, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आता प्रशासन काय पावले चालणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

एप्रिलपासून झाली बाधितांची सुरवात 

जालन्यात ता. सहा एप्रिलला दुखीनगर येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित आढळली होती. हैदराबाद प्रवासाची पार्श्वभूमी तिला होती. पुढे उपचारानंतर तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर ता. २१ एप्रिलला शिरोडा (ता. परतूर) येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारानंतर ही महिला कोरोनामुक्त झाली, तिला सुटीही मिळाली. ता. १ मे रोजी पारध (ता. भोकरदन) येथे गुजरातमधून आलेली युवती पॉझिटिव्ह निघाली. ता. दोन मे रोजी परतूर तालुक्यात मुंबईहून आलेला युवक व मालेगाव बंदोबस्तावरून परतलेल्या चार जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ता. १० मे रोजी कानडगावात (ता. अंबड) मुंबईवरून आलेले दोनजण पॉझिटिव्ह; तसेच जालना शहरातील इंदेवाडीतील रंगनाथनगर भागातील गर्भवती पॉझिटिव्ह आली. ता. ११ मे : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व राज्य राखीव दलाचा जवान पॉझिटिव्ह आला. ता. १२ मे : राज्य राखीव दलातील एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. तर ता. १३ मे रोजी मुंबई येथून आलेला शहरातील रामनगर येथील युवक, राखीव दलाचा जवान; तसेच परतूर तालुक्यातील एकजण असे तिघे पॉझिटिव्ह निघाले. 

परतूरच्या युवकाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह 

परतूर तालुक्यात मुंबईहून आलेल्या युवकाचा दुसरा अहवाल बुधवारी (ता. १३) कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, बुधवारी परतूर येथील पॉझिटिव्ह आलेला अन्य रुग्ण या कोरोनाबाधित युवकाचा नातेवाईक आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna