उदगीरात चाचण्या मंदावल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाण झाले कमी, उपचारांवर भर

युवराज धोतरे
Monday, 9 November 2020

दिवसेंदिवस उदगीर शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.

उदगीर (जि.लातूर) : दिवसेंदिवस उदगीर शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या संसर्गाचा धोका असतानाही सध्या संख्या कमी होण्यामागे चाचण्या कमी झाल्याचे कारण दिसून येत असून काही खासगी रुग्णालयात चाचण्याऐवजी संशयित, लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांच्या उपचारावर भर दिला जात असल्याची चर्चा शहरात चालू आहे. उदगीर येथील कोरोना रुग्णालयात आतापर्यंत शहर व तालुक्यातील एकूण एक हजार ९६८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद झाली आहे तर उदगीरसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील एकूण दोन हजार २८९ रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिरीष बोराळकरांची उमेदवारी जाहीर, आता इच्छुकांमध्ये नाराजी

आतापर्यंत एकूण एक हजार १७५ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. ५०५ रूग्णांना गृहविलगीकरण तर ८८ रुणांचा मृत्यू झाला आहे. यातील ४७५ रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले असल्याची माहिती कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे. सध्या दररोज अत्यंत कमी प्रमाणात तपासण्या होत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मात्र ज्या रुग्णांना लक्षणे दिसत आहेत अशा संशयित रुग्णांना येथील काही खासगी रुग्णालयात चाचणी न करता दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत असल्याची चर्चा आहे.

येथील एका खासगी रुग्णालयाच्या एक महिला डॉक्टर कोरोना रुग्णालयात शासकीय सेवेत असतानाही खासगी दवाखान्यातील रुग्ण तपासणी करत असल्याची चर्चा आहे. एकीकडे कोरोना रुग्णालयात शासकीय सेवा तर दुसरीकडे खासगी दवाखान्यात इतर रुग्णांवर उपचार करत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त भीती असते. हे आरोग्य प्रशासनाला माहीत असतानाही खासगी प्रॅक्टिस सुरूच असल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होत आहे. याबाबत सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना खासगी प्रॅक्टिस करण्याची परवानगी या डॉक्टरला आहे किंवा नाही हे कागदपत्रे पाहून सांगावे लागेल. सध्या संबंधित विभागाचा लिपिक लातूरला गेल्या असल्याने हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

कंगना राणावतच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रकरण

परवानगी नसताना कोरोनावर उपचार
येथील एका खासगी रुग्णालयात शासनाची कुठलीच परवानगी नसताना एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागास हे माहीत असूनही त्यांनी या हॉस्पिटलवर कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे शासनाचे नेमके धोरण काय? याविषयी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Test Slow Down In Udgir