
उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत दोन हजार २७७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे,
उमरगा (उस्मानाबाद): उमरगा शहर व ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान तालुक्यातील कसगी गावातील एक महिला तर जकेकुर येथील जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.१९) उपजिल्हा रुग्णालयाने दिला आहे.
उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत दोन हजार २७७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यातील एक हजार २२ रुग्ण उमरगा शहरातील तर एक हजार २५५ रुग्ण ग्रामीण भागातील होते. दोन हजार १७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ जण उपचारासाठी दाखल झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र होते मात्र पंधरा दिवसात संसर्ग वाढत आहे.
जवळपास ३५ रुग्णांची नोंद या कालावधीत झाली आहे. विवाह सोहळ्याला कसगीत आलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा तर जकेकुरच्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान १३ जानेवारीला मृत्यु झाला आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती प्रशासनाने मंगळवारी दिली आहे. दरम्यान शासनाने सार्वजनिक कार्यक्रमाला मर्यादित स्वरुपात सवलत दिलेली आहे मात्र नियमाचे उल्लंघन करत गर्दी करण्याचे चित्र दिसत आहे. कमी झालेला कोरोना संसर्ग पून्हा घराघरात येण्याचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारली पाहिजे.
बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे काम
सरकारी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी घेतली लस-
कोरोनाच्या भयावह काळात जीवाजी पर्वा न करता काम करणाऱ्या उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता.१९) लस देण्यात आली. परिचारिका यास्मीन मुल्ला या पहिल्या लाभार्थी ठरल्या. नोडल ऑफीसर डॉ. विक्रम आळंगेकर यांनीही लस घेतली. नोंदणी केलेल्या व प्राप्त झालेल्या शंभर लसपैकी मंगळवारी सांयकाळी सहा पर्यंत ७८ जणांनी लस घेतली. या वेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे, डॉ. प्रविण जगताप आदी उपस्थित होते.
(edited by- pramod sarawale)