बेरोजगारांच्या खिशातून केली पोस्टाने तीस कोटींची कमाई!पदभरतीच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे काम

अनिल जमधडे
Tuesday, 19 January 2021

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या पोस्ट खात्याने पदभरतीची जाहिरात दिल्यानंतर शुल्कापोटी तीस कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे.

औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगारांना ओरबाडण्याचे काम शासनदरबारीही सुरुच आहे. विविध भरतीच्या शुल्कापोटी कोट्यवधी रुपये कमावण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या पोस्ट खात्याने पदभरतीची जाहिरात दिल्यानंतर शुल्कापोटी तीस कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे. देशभरात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. विविध महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊन तरुण मोठ्या आशेने नोकरी मिळेल या अपेक्षेने प्रयत्न करताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी विविध विभागाच्या ज्‍या जागा निघतात, त्याच्या कित्येक पटीने बेरोजगार नोकरी मिळेल या अपेक्षेने खिन्न नजरेने नोकरीसाठी अक्षरशः भटकंती करीत आहेत.

महाराष्ट्रात पदांची भरती
टपाल खात्याची वसुली भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागामध्ये १,३७१ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. यासाठी आक्टोबरमध्ये जाहिरात काढण्यात आली. ३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. या जाहिरातीनुसार पोस्टमनची १०२९ पदे, मेलगार्ड १५ पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) (सब ऑर्डीनेट ऑफिसर) २१५, आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) ३२ अशी ही पदे आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. अर्जासोबत ५०० रुपये शुल्क ठेवले होते. सध्या या भरती प्रक्रियेसाठी महिनाभरापासून राज्यातील विविध केंद्रांवर खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्यात येत आहेत.

अशी केली कमाई
टपाल खात्याने सुरु केलेल्या या भरतीसाठी पाचशे रुपये अर्जासोबत शुल्क म्हणून ठेवले. या भरतीसाठी राज्यातून तब्बल ६ लाख ५५ हजार ९८९ अर्ज आले आहेत. यातून केवळ ऑनलाइन पद्धतीने पोस्टाला तब्बल बारा कोटी ५६ लाख, ८४ हजार रुपये गोळा झाले आहेत. माहितीच्या अधिकारात पोस्टाने ही माहिती दिली आहे. उल्हासनगर येथील देविदास कुंजटवाड यांनी माहितीच्या आधारात माहिती मागवली होती. त्यांना दिलेल्या माहितीत पोस्टाने ऑनलाइन पद्धतीने रुपये १२,५६,०८४०० जमा झाल्याचे सांगीतले. तर ऑनलाइन पद्धतीने जमा झालेल्या शुल्काची मोजणी पूर्ण झाली नसल्याची माहिती माहिती पोस्टाने दिली आहे. असे असले तरीही आलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन असे एकूण सहा लाख अर्जानुसार अंदाजे ३० कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम पोस्टाने कमावली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Post Department Earned Thirty Crores From Unemployment Youths Auranagabad News