esakal | गावात रोग पडला, की गावकरी जातात शेतात, असं कधी कधी झालं... 
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

प्लेगची साथ आली, तेव्हा गावागावात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. या उंदरांच्या पाठीवरून प्लेगच्या पिसवा आल्या आणि गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकं शेतात राहायला सुरवात झाली. नाहीतर, तोपर्यंत माणूस गावाला बऱ्यापैकी धरून असे, हा काळ होता, १९व्या शतकाच्या शेवटाचा. 

गावात रोग पडला, की गावकरी जातात शेतात, असं कधी कधी झालं... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : जगभर कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि शहरातील गावाकडे येणारी गर्दी बघून ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शेतकरी कुटुंबे गाव सोडून शेतात जाऊन राहत आहेत. असं हे पहिल्यांदाच घडतंय, असं नाही. यापूर्वीही असं अनेकदा झालं आहे. 

कोरोना रोगामुळे देशात आणि राज्यात रोजच्या रोज वाढता आकडा बघून शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. शहरात कामासाठी व्यवसासाठी अनेक युवक, नागरीक पुणे, मुंबई,औरंगाबाद गेले होते. ते गावाकडे येत आहेत. या लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून गावात येत असले, तरी विषाणूची लक्षणे लवकर दिसत नाहीत. गावात असल्यास एकमेकांच्या संपर्कात माणूस येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, असं म्हणत गावातले लोक शेतात जाऊन राहिले आहेत. 

पूर्वी साथीचे आजार फार येत. त्यामागे देवीचा कोप, किंवा काही तत्सम दैवी कारणं असतील, असे समजून नवस सायास केले जात. महामारीला गावातून हद्दपार करण्यासाठी मरीआईचा गाडा गावाबाहेर नेऊन सोडला जाई. किंवा बळी वगैरेही देण्याची प्रथा होती. 

प्लेगची साथ आली, तेव्हा गावागावात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. या उंदरांच्या पाठीवरून प्लेगच्या पिसवा आल्या आणि गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकं शेतात राहायला सुरवात झाली. नाहीतर, तोपर्यंत माणूस गावाला बऱ्यापैकी धरून असे, हा काळ होता, १९व्या शतकाच्या शेवटाचा. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

या प्लेगच्या साथरोगाला अटकाव करण्यासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं अनेक प्रयत्न केले. तेव्हा लोकांवर जुलूम-जबरदस्ती झाली, म्हणून पुण्यात इंग्रज अधिकाऱ्याचा खूनही झाला. पण कालांतराने हा रोग आटोक्यात आला. मराठवाड्यातही बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या सळिंबा आणि मामला या गावांमध्ये प्लेगचे रुग्ण आढळले होते. काही दिवसांपूर्वी त्या गावातही उंदरांवर पुन्हा पिसवा दिसू लागल्याचे समोर आले होते. 

दुष्काळातही सोडली गावं

गावात दुष्काळ पडला, की लोकं शेतात राहायला जात असत. त्यामुळे एकतर खाण्यात वाटेकरी कमी होत आणि गरजा कमी झाल्यामुळे भागून जाई. १९७२च्या दुष्काळातही लोकांनी गाव सोडून शेतात बिऱ्हाड थाटले. काही जण दुष्काळ संपल्यानंतर गावात परत आले. पण बहुतांश लोक शेतातच स्थायिक झाले. 

मराठवाड्यातल्या गावांमधून सर्वाधिक स्थलांतर झालं, ते किल्लारीच्या भूकंपानंतर. ३० सप्टेंबर १९९३ या दिवशी किल्लारी आणि आजूबाजूची गावं हादरली. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कित्येक गावांना या भूकंपानं मोठा हादरा दिला. गावंच्या गावं उध्वस्त झाली. घरं मोडली, कित्येकांनी प्राण सोडला, त्या आठवणी आजही अनेकांच्या मनाचा थरकाप उडवतात. 

या भूकंपाची भीषणता मोठी.. 

किल्लारीच्या या भूकंपात सुमारे ७ हजार ९२८ जण मृत्युमुखी पडले. १५ हजार ८५४ जनावरं दगावली, तर अंदाजे १६ हजारांहून अधिक लोक जखमी झाले. 
या भूकंपाचा धक्का एवढा जबरदस्त होता, की ५२ गावांतली ३० हजार घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.

महाराष्ट्रासह लागून असलेल्या राज्यांतल्याही एकूण १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लातूर जिल्ह्यातल्या औसा या तालुक्यांना किल्लारीच्या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे घाबरलेले लोक, मुख्यतः शेतकरी तर गावात राहणं सोडून रानात राहायला गेले. पक्क्या घरांमधून न राहता झोपड्या करून राहू लागले. 

आताही तसंच होतंय

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरांतली कुटुंबं जसजशी गावात येऊ लागली, तशी ती संसर्ग घेऊन येतील, या भीतीनं गावकऱ्यांनी आधी त्यांना बंदी केली. मग त्यांना वेगळं राहण्याचं बंधन केलं. पण लोंढे वाढूच लागल्यामुळे जेव्हा हेही अशक्य होऊन बसलं, तेव्हा शेतकऱ्यांनी मात्र आपलं बिऱ्हाड शेताकडे हलवलं. गावाशी त्यांनी पूर्णपणे संबंध तोडला आहे. 

अनेक युवक, नागरीक पुणे, मुंबई येथून आले आहेत. आले म्हणजे त्यांची चूक नाही, पण म्हणावी तशी खबरदारी घेतली जात नाही. आरोग्य तपासणी झाली असली, तरी हा आजार संसर्गजन्य असल्याने आपली आपण काळजी घेतलेली बरी, म्हणून आम्ही शेतात राहत आहोत.
- गोविंद इंगळे, सरवडी

लातूर जिल्ह्यातल्या मदनसुरी इथले बातमीदार सिद्धनाथ माने यांनी सांगितलं, की परिसरातील मदनसुरीची ९ कुटुंबं, रामतीर्थची १०, सरवडीची ६, अंबुलग्याची ५, भूतमुगळीची १५ कुटुंबं शेतांनी राहायला गेली आहेत. उदरनिर्वाहासाठी गरजेच्या तेवढ्या वस्तू बैलगाडीत भरून ही कुटुंबं शेतांकडे स्थलांतर करत आहेत. गावात ग्रामपंचायतीचे लोक जंतुनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र, कित्येक गावांमध्ये अजून ही फवारणी सुरू झालेली नाही. 

शेतात रात्री सिंगल फेज लाईट सोडा

शेतात राहायला गेलेल्या गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. विंचू, साप, रानडुकरांच्या भीतीने त्यांनाही जीव मुठीत धरून राहावे लागते आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात सिंगल फेज लाईट सोडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत.

निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले, "जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक यांना प्रत्येक गावात भेटी देणे, जंतुनाशक फवारणी करणे, कोरोनाविषयी जनजागृती करणे, यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. ते प्रत्येक गावात जात आहेत."

महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. ढाकणे यांनी सांगितले, की सध्या कोरोनामुळे शेतकरी शेतात राहत असले, तरी आपल्याकडे शेतात सिंगल फेज सोडण्यासाठी यंत्रणा नाही. थ्री फेजही वेळापत्रकानुसार सोडावी लागते. सध्या तरी तसं करणं शक्य होणार नाही.

गावामध्ये कोणीही कोणाचे ऐकत नाही. शहरातील अनेकक जण येत आहेत. लहान लेकरं, वयोवृद्ध आई, वडिलांसह आम्ही शेतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात रात्र अंधारात काढावी लागत आहे. शासनाने शेतातील रात्री लाईट चालू ठेवावी.
- सुनील बाबळसुरे, रामतीर्थ (ता.निलंगा)