Coronavirus : जालना जिल्ह्यात नवे १७ रुग्ण, तिघे झाले बरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

 जालना शहरात वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत असल्यामुळे व्यापारी महासंघाने स्वयंस्फूर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळला. या बंदमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, अशी आशा होती. मात्र, हा कर्फ्यू संपताच सोमवारी शहरात विविध भागांत सात रुग्ण आढळून आले आहेत.

जालना  : जिल्ह्यात दिवसेंदिवस पसरलेला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. सोमवारी (ता. २२) जालना शहरातील सात, अंबडमधील एक व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊ अशा १७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. कोविड हॉस्पिटलमधील तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जालना शहरात वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत असल्यामुळे व्यापारी महासंघाने स्वयंस्फूर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळला. या बंदमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, अशी आशा होती. मात्र, हा कर्फ्यू संपताच सोमवारी शहरात विविध भागांत सात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मंगळबाजार भागातील दोन, हकीम मोहल्ला येथील एक, नाथबाबा गल्लीतील एक, वाल्मीकीनगरमधील दोन व राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश आहे. उर्वरित दहामध्ये तसेच अंबड शहरातील चांगलेनगरमधील एक व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊजणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

दरम्यान, कोविड हॉस्पि‍टलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. बरे झालेल्यांमध्ये उडपी हॉटेल परिसरातील एक, राज्य राखीव दलातील दोन जवानांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. सोमवारी वाढलेल्या सतरा रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ झाली असून, त्यापैकी २४८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

BIG NEWS - ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द
 

जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्‍थात्मक अलगीकरण 
कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १०, संत रामदास वसतिगृहात ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १६, मुलींच्या शासकीय निवासी वसतीगृहात ३१ तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५६ व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ५ , अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ३ तर शासकीय मुलींच्या वसतीगृहात १२ व्यक्ती अलगीकरणात आहे.

बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्रमांक दोनमध्ये १२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात तीन, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये नऊ व टेंभुर्णीतील ई. बी. के. विद्यालयात ३३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
  

कोरोना मीटर 

  • एकूण बाधित : ३७८ 
  • बरे झालेले :२४८ 
  • उपचार सुरू : ११९ 
  • मृत्यू : ११ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: Jalna reports 17 new cases