Coronavirus : जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे नव्याने नऊ जणांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

साठ जणांना हलविले अलगीकरण केंद्रात, चिंतेत भर 

टेंभुर्णी (जि. जालना) : येथील शाळेत क्वारंटाइन केलेल्या ३३ जणांपैकी नऊजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे साखळी तोडण्यासाठी संपूर्ण गाव गुरुवारपर्यंत (ता. २५) बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३३ जणांना शनिवारी (ता. २०) क्वारंटाइन केले होते. त्यातील नऊ जणांच्या कोविड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्याअनुषंगाने येथील पोलिस ठाण्यात तहसीलदार सतीश सोनी, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक घेतली व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारपर्यंत संपूर्ण गाव शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला; तसेच नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून साठ नागरिकांना रात्री उशिरापर्यंत येथील खासगी शाळेत अलगीकरण करण्यात आले.

ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

पॉझिटिव्ह निघालेल्या नऊ रुग्णांना जाफराबाद येथील संस्था अलगीकरण केंद्रात हलविण्यात आले, तर त्यांच्या संपर्कात असलेल्या पाचजणांना टेंभुर्णी येथील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. एकोणवीस नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी दुपारी घरी सोडण्यात आले. बैठकीला टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश साबळे, फौजदार ज्ञानेश्वर साखळे, रामधन कळंबे, सरपंच गणेश धनवई, ग्रामसेवक सुखदेव शेळके, फैसल चाऊस, प्रदीप मुळे, महेश वैद्य, दिनकर चंदनशिवे यांच्यासह आरोग्यसेविका, आशा वर्कर्स हजर होत्या. 

आता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...
 

जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्‍थात्मक अलगीकरण 
जालना : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १०, संत रामदास वसतिगृहात ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १६, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३१, तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ५, अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ३, तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १२ व्यक्ती अलगीकरणात आहे. बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्रमांक दोनमध्ये १२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे; तसेच जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात तीन, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये नऊ व टेंभुर्णीतील ई.बी.के. विद्यालयात ३३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

 

नागरिकांनी घरातच बसून राहावे. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- ज्ञानेश्‍वर पायघन, सहायक पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: Tembhurni reports 9 new cases