कोरोनाचे संकट दूर होणे महत्‍त्वाचे : खासदार हेमंत पाटील

राजेश दारव्हेकर/विनायक हेंद्रे
Tuesday, 7 April 2020

सर्व खासदारांचा निधी दोन वर्षांसाठी स्‍थगित करण्यात आला आहे. यामुळे मतदारसंघातील कामांना खीळ बसणार असली तरी हा निधी कोरोना विरुद्धच्या संघर्षासाठी वापरला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. 

हिंगोली: कोरोना विरोधातील संघर्षासाठी पंतप्रधान, मंत्री, खासदारांच्या वेतनात तीस टक्‍क्यांची कपात करण्यात आली आहे. तसेच सर्व खासदारांचा निधी दोन वर्षांसाठी स्‍थगित करण्यात आला आहे. यामुळे मतदारसंघातील कामांना खीळ बसणार असली तरी हा निधी कोरोना विरुद्धच्या संघर्षासाठी वापरला जाणार आहे. देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर करणे पहिले सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता. सात) व्यक्‍त केले.

देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर करणे हे प्रथम कर्तव्य समजतो. खासदारांना मिळणाऱ्या वेतनात कपात केली, हे योग्य आहे. यातून आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य साधने मिळतील. यामुळे देशावर आलेले कोरोनाचे संकट पळवून लावण्यासाठी मदतच होणार आहे. 

हेही वाचा हिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित

विकास कामांना खीळ बसणार

प्रत्येक नागरिक जगलाच पाहिजे, त्‍यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजचे आहे. मात्र दोन वर्षांसाठी निधीला मिळालेल्या स्‍थगितीमुळे मतदारसंघातील कामांना खीळ बसणार आहे. निधीला स्‍थगिती देणे गरजचे नव्हते, असे मला वाटते. गावात काही तरी द्या, अशी मागणी करीत असतात. विकासनिधीतून मतदारसंघात छोटी - मोठी कामे करण्यास मदत होते. 

देशावर कोरोनाचे संकट

कामाचा लेखाजोखादेखील सर्वांना देता येतो. मात्र, आता निधीला मिळालेल्या स्‍थगितीमुळे विकासकामांना खिळ बसणार आहे. मात्र, देशावर आलेल्या कोरोनाचे संकट सर्वांना माहीत आहे. त्‍यासाठी केंद्र, राज्य शासनासह संबंधित कर्मचारी यात रात्रंदिवस कामे करीत आहेत. 

गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा

लोकप्रतिनीधीदेखील या कामात पुढाकार घेत आहेत. गरजूंपर्यंत आरोग्य सेवा तसेच गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. निधीत कपात केली जात असला तरी कोरोनाचे संकट पळवून लावणे महत्वाचे असल्याचे मत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

स्वीय सहायक आले मदतीस धावून

आखाडा बाळापूर : एका ज्येष्ठ शिक्षकाच्या हार्ट व शुगर या आजाराची औषधी खासदार हेमंत पाटील यांचे स्वीय सहायक आय. जी. मठपती यांनी उपलब्ध करून देत संकट काळात शिक्षकास मदतीचा हात दिला आहे. येहळेगाव (तुकाराम) जिल्हा परिषद प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनंत लोकरे यांच्यावर पाच वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. 

येथे क्लिक कराट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’

दररोज औषधीची गरज

त्याच बरोबर शुगर असल्याने त्यांना दररोज औषधी घ्यावी लागते. संचारबंदीच्या काळात नांदेड येथून औषधी कशी आणाव्यात, या चिंतेत ते होते. ही माहिती शेख फारूख गिरगावकर यांनी खासदार हेमंत पाटील व त्यांचे स्वीय सहायक तथा ग्रामसेवक संघटनेचे सचिव आय. जी. मठपती यांना सांगितली.

नांदेड येथून आणली औषधी

 आय. जी. मठपती यांनी स्वत: नांदेड येथून सदर औषधी मंगळवारी (ता. सहा) शिक्षक अनंत लोकरे यांना उपलब्ध करून दिली. या वेळी शेख फारूख गिरगावकर, सचिन पेंढारकर, अविनाश सावंत, मोहम्मद शोएब, मोहम्मद अखीब उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption crisis is important: MP Hemant Patil Hingoli news