
पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्याच घरातील अन्य एकाने पुन्हा विष प्राशन केल्याची घटना तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे समोर आली आहे.
परळी वैजनाथ (जि.बीड) : पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्याच घरातील अन्य एकाने पुन्हा विष प्राशन केल्याची घटना तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे समोर आली आहे. प्रियंका सायस पंडित (वय १९) व सायस विलास पंडित (वय २५) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर, गणेश विलास पंडित असे विष घेतलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पांगरी येथील सायस विलास पंडित व भाऊ गणेश पंडित हे कुटुंब मोलमजुरी करून राहत होते. सायसचा विवाह जुलै महिन्यात तालुक्यातील तळेगाव येथील प्रियंका हिच्याशी झाला.
प्रियंका व सायस गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र, त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. मंगळवारी (ता.एक) या कुटुंबात वाद झाला. या वादातून प्रियंका पंडित हिने विष प्राशन केले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. पत्नीचा मृत्यू सहन न झाल्याने रात्री अकराच्या सुमारास पती सायस पंडित याने गळफास लावून आत्महत्या केली.
त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कुटूंबातील कर्त्या भावासह वहिनीचा मृत्यू झाल्याने सायसचा लहान भाऊ गणेशनेही बुधवारी (ता. दोन) विष प्राशन केले. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सायचा एक भाऊ तीन वर्षांपूर्वी परळी बीड रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता.
संपादन - गणेश पिटेकर