उस्मानाबाद जिल्ह्यात २९ जणांना कोरोनाची लागण, बारा रूग्ण परतले घरी

तानाजी जाधवर
Wednesday, 25 November 2020

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२५) २९ जणांना कोरोनाची लागण झाली असुन बारा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२५) २९ जणांना कोरोनाची लागण झाली असुन बारा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मृत्यु झाल्याची नोंद नाही. असे असले तरी मृत्युदर अजुनही कमी झालेला नाही. सध्या ३.६३ टक्के इतका मृत्युदर आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १४ हजार ७३९ इतक्या रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी सुखरुप पाठविण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्क्यांवर गेले आहे. साहजिकच अजूनही जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.

ही संख्या वाढु नये. यासाठी प्रशासनाकडुन उपाययोजना सुरुच आहेत. त्यातही गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मृत्युची घटना घडलेली नसल्याने निश्चितपणाने एक दिलासादायक वातावरण निर्माण झालेले आहे. बुधवारी सापडलेल्या २९ रुग्णांचा विचार केला तर संशयितांची संख्याच आता कमी होत असल्याचे चित्र आहे. १३८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यातील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तर ३९० जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली.

त्यातील १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये उस्मानाबाद दहा, वाशी सहा, लोहारा, कळंब व परंडा प्रत्येकी तीन, भूम दोन, तुळजापुर व उमरगा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तालुकानिहाय संख्या पाहिली तर उस्मानाबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९५ हजार ७७० इतक्या संशयिताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील १५ हजार ६२४ इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण पाहिले तर साधारण १६.२८ टक्के इतके दिसुन येत आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५६२४
बरे झालेले रुग्ण - १४७३९
उपचाराखालील रुग्ण - ३२०
एकुण मृत्यु - ५६५
आजचे बाधित - ३२
आजचे मृत्यू - ००

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 29 New Cases Reported In Osmanabad District